हॉकी स्टेडियमजवळ धावती ई-बाईक पेटली
By उद्धव गोडसे | Published: June 2, 2024 01:03 PM2024-06-02T13:03:51+5:302024-06-02T13:04:23+5:30
दहाच्या सुमरास घडलेल्या घटनेत बाईक जळून खाक झाल्याने सुमारे लाखाचे नुकसान झाले.
कोल्हापूर : हॉकी स्टेडियम येथे चालत्या ई-बाईकने पेट घेतला. रविवारी (दि. २) सकाळी दहाच्या सुमरास घडलेल्या घटनेत बाईक जळून खाक झाल्याने सुमारे लाखाचे नुकसान झाले. ताराराणी चौक येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी अर्धा तास प्रयत्न करून आग विझवली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाडळकर कॉलनी येथील सचिन संभाजीराव पाडळकर हे त्यांची ई-बाईक घेऊन शहरात येत होते. हॉकी स्टेडियमजवळ अचानक त्यांच्या बाईकमधील बॅटरीतून धूर येऊ लागला. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बाईक रस्त्याकडेला लावली. त्यानंतर काही क्षणात बाईकने पेट घेतला. त्यांनी तातडीने अग्निशामक दलास घटनेची माहिती दिली.
काही वेळात ताराराणी चौक येथील एक बंब आणि जवान घटनास्थळी दाखल झाले. सुमारे अर्धा तास प्रयत्न करून त्यांनी आग विझवली. मात्र, तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाली. अग्निशामक दलाचे जवान मधुकर जाधव, माणिक कंभार, महेश येवळे यांच्यासह चालक उमेश जगताप यांनी आग विझवली. बाईकमधील बॅटरीत झालेल्या बिघाडामुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता अग्निशामक दलाच्या जवानांनी वर्तवली.