ए. एस. ट्रेडर्समधील दोन हजार कोटींच्या गुंतवणुकीवर पाणी; कोल्हापुरातील दोन्ही कार्यालये बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 06:49 PM2022-11-24T18:49:23+5:302022-11-24T18:49:49+5:30
ए. एस. ट्रेडर्सच्या इंग्रजीतील एका साध्या पत्रावर लोकांनी दहा आणि पंधरा लाख रुपये गुंतविले आहेत
विश्वास पाटील
कोल्हापूर : शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करून महिन्याला तीन टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविलेल्या ए. एस. ट्रेडर्स या कंपनीत सुमारे ८३ हजार लोकांनी किमान दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती पुढे येत आहे. आता परतावे देण्याचे बंद केल्यावर लोकांना आपली मूळ मुद्दल मिळणार का, याबद्धल भीती वाटत असून, अर्थतज्ज्ञांच्या मते ही रक्कम परत मिळण्याची शक्यता फारच धूसर आहे. परतावे बंद झाल्याचे ‘लोकमत’मध्ये बुधवारी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. या कंपनीची कोल्हापुरात शाहूपुरी व ताराबाई पार्कातील पितळी गणपतीजवळ असणारी कार्यालये गुंतवणूकदारांनी बंद पाडली.
दुुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पन्नासहून अधिक गुंतवणूकदार ताराबाई पार्कातील कार्यालयात गेले. त्यावेळी तिथे १५ ते २० कर्मचारी होते. त्यातील महिलांना अगोदर बाहेर जाण्यास सांगितले व त्यांनी या कार्यालयाचे शटर ओढले. त्यानंतर शाहूपुरीतील कार्यालयातही तसेच झाले. लोकांतील संतप्त भावना विचारात घेऊन कंपनीनेच स्वत:हून कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
या कंपनीच्या वेबसाईटवर ८३ हजार गुंतवणूकदारांची नोंद बुधवारी दिसत होती. कोल्हापूरसह बेळगाव, हुबळी, विजापूर, सांगली, सातारा, नांदेडपासून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथूनही कंपनीत गुंतवणूक झाली आहे. साधारणपणे गुंतवणुकीचा किमान आकडा दोन हजार कोटींचा आहे. तो वाढू शकेल, परंतु कमी होणार नाही अशी माहिती कंपनीच्याच व्यवहाराशी संलग्न असलेल्या व्यक्तीकडून मिळाली. अशा प्रकारच्या फसव्या योजनांमध्ये गुंतवणूक केलेला पैसा कधीही गुंतवणूकदारांना परत मिळालेला नाही. कारण जमा केलेले पैसे वेगवेगळ्या स्तरांवर अगोदरच वाटलेले असतात.
कंपनीच्या प्रमुखांनी हा पैसा घरे, फ्लॅट, जमिनीसह अन्य मालमत्तेमध्ये तिसऱ्याच्याच नावावर गुंतविलेली असते. त्यांनी अगोदरच सांगितल्यानुसार शेअर्स ट्रेडिंगमध्ये त्यांनी रक्कम गुंतविलेली असेल तर त्यातून ते पैसे देऊ शकतात; परंतु ही रक्कम फारच कमी असण्याची शक्यता आहे. या कंपन्यांचे सेबीकडे नोंदणी नव्हती. पैसा घेणारी एक कंपनी, लाभ देणारी दुसरीच असा व्यवहार होता.
साध्या पत्रावर लाखोंची गुंतवणूक
ए. एस. ट्रेडर्सच्या इंग्रजीतील एका साध्या पत्रावर लोकांनी दहा आणि पंधरा लाख रुपये गुंतविले आहेत. गुंतवणूकदारांनी धनादेश दिला आहे. त्यामध्ये व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक एवढाच उल्लेख आहे. भागीदारीसाठीचा अर्ज असे त्यावर म्हटले आहे. आता हे पत्र दाखवून कोणही एक रुपयांही परत देऊ शकणार नाही. कारण त्यास कायदेशीर वैधता शून्य आहे. हे पैसे कशासाठी दिले, ते परत कधी देणार, त्याचा व्याज दर किती यातील काहीही त्यावर नोंद नाही. चक्क आंधळेपणाने हा व्यवहार झाला आहे.
ए. एस. म्हणजे काय..?
ए. एस. हे लोहितसिंग सुभेदार यांच्या आईच्या नावाच्या इंग्रजी अध्याक्षरापासून दिलेले नाव आहे. त्यांच्या आईचे नाव अलकाताई सुभेदार. हे कुटुंब मूळचे सांगली जिल्ह्यातील पलूसचे आहे. परंतु, गेल्या दहा वर्षांपासून त्यांचा या गावाशी फारसा संबंध नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.