पन्हाळगडावर आत्महत्येचा प्रयत्न करणारा शाळकरी मुलगा बेशुद्धावस्थेत, नेमके कारण अद्याप अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 05:45 PM2022-09-24T17:45:08+5:302022-09-24T17:45:32+5:30
डोक्याला जबर मार लागल्याने तो बेशुद्धावस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत
पाचगाव (कोल्हापूर): मराठा कॉलनी पाचगाव येथे राहणाऱ्या आठवीत शिकणाऱ्या अभिषेक दिलीप करंजे याने काल, शुक्रवारी पन्हाळागडावरील अंधार बाव टेकडीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो बेशुद्धावस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे नेमकी माहिती मिळाली नाही.
शुक्रवारी सकाळी अभिषेक एन.सी.सी साठी शाळेत जाऊन आला. त्यानंतर शाळेला जातो म्हणून दफ्तर घेवून गेला. परंतु तो एस.टी ने थेट पन्हाळगडावर पोहोचला. याठिकाणी त्याने अंधारबाव परिसरातील तटबंदीवरुन उडी मारली. सुदैवाने तो स्मशानभूमीच्या शेडवर पडल्याने त्याचा जीव वाचला. पण त्याला जबर दुखापत झाली असून तो बेशुद्धावस्थेत आहे.
शाळेची वेळ झाल्यानंतरही अभिषेक घरी आला नाही म्हणून आईने शोधाशोध केली. परंतू त्याचा काही पत्ता लागला नाही. तोपर्यंत रात्री नऊच्या सुमारास पन्हाळा पोलिसांचा फोन आला आणि अभिषेक पन्हाळगड येथे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याला सी.पी.आर येथे दाखल करून तेथून खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
मूळचे सांगलीचे असणारे दिलीप करंजे हे आपल्या कुटुंबासमवेत मराठा कॉलनी पाचगाव येथे गेल्या आठ वर्षांपासून वास्तव्यास आहेत. ते सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीस आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. अभिषेक हा आठवीच्या वर्गात शिकत असून अत्यंत मनमिळावू स्वभावाचा व अभ्यासात देखील हुशार आहे. त्याने चित्रपट व मालिकेमध्ये देखील काम केले असून त्याला अभिनयाची आवड आहे. परंतु त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? असा प्रश्न नातेवाईकांसह शेजाऱ्यांना पडला आहे.