समुद्री गरुडाने घेतला रंकाळाकाठी जन्म, कोल्हापुरातील पहिलीच घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 12:03 PM2024-03-26T12:03:03+5:302024-03-26T12:03:03+5:30

आदित्य वेल्हाळ कोल्हापूर : तीन वर्षांपूर्वी कोकणातून रंकाळा येथे स्थलांतरित झालेल्या पांढऱ्या पोटाचा समुद्री गरुडाने आपल्या पिलांना जन्म दिला ...

A sea eagle takes birth near Rankala, the first incident in Kolhapur | समुद्री गरुडाने घेतला रंकाळाकाठी जन्म, कोल्हापुरातील पहिलीच घटना

समुद्री गरुडाने घेतला रंकाळाकाठी जन्म, कोल्हापुरातील पहिलीच घटना

आदित्य वेल्हाळ

कोल्हापूर : तीन वर्षांपूर्वी कोकणातून रंकाळा येथे स्थलांतरित झालेल्या पांढऱ्या पोटाचा समुद्री गरुडाने आपल्या पिलांना जन्म दिला आहे. समुद्राच्या काठावर वास्तव्यास असलेल्या गरुडाने रंकाळाच्या काठी जन्म देणे, ही पहिली घटना असून हे रंकाळा तलावाच्या जैवविविधतेच्या समृद्धतेचे उत्तम उदाहरण मानावे लागेल.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यात २०२१ला प्रचंड पाऊस झाला होता. त्यावेळी पावसानंतर या समुद्र गरुडाच्या जोडीने कोल्हापुरातील रंकाळ्यावर स्थलांतर केले. पक्षिप्रेमींना त्यावेळी या जोडीचे पहिल्यांदा दर्शन झाले होते. इतक्या लांबून हे पक्षी पहिल्यांदाच कोल्हापुरामध्ये आल्याने पक्षिप्रेमींना आनंद झाला. ते येथे राहावेत, प्रजनन करून त्यांनी कुटुंब वाढवावे यासाठी त्याची गोपनीयता पक्षिप्रेमींनी ठेवली. त्यांना लागणारे खाद्य रंकाळ्यात सहज उपलब्ध होत असल्याने त्यांनी तिथेच घरटे बांधले. मात्र, मानवी वर्दळ जवळ असल्याने त्यांनी २०२१ व २०२२ मध्ये घरटे बांधण्याचा दोनवेळा प्रयत्न केला; पण त्यांच्यामध्ये मिलन झाले नाही. 

नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांनी मानवी वर्दळीपासून दूर अशा ठिकाणी घरटे बांधले आणि त्यांनी प्रथमच कोल्हापुरात एका पिलाला जन्म दिला. पूर्ण वाढ झालेल्या समुद्री गरुडाचे डोके, छाती, पोट हे पांढरे शुभ्र असून, त्याची पाठ व पंख हे राखाडी रंगाचे आहेत. या समुद्री गरुडाच्या जोडीने इतका लांब प्रवास करून रंकाळा हे ठिकाण निवडणे व पिलाला येथे जन्म देणे यावरून रंकाळा संवर्धन करण्याची खरी जबाबदारी आपल्या सर्व कोल्हापूरकरांची आहे.

रंकाळ्याच्या काठावर गरज नसताना सिमेंटचे बांधकाम करू नये, उंच वाढतील अशी नवीन देशी झाडे लावली पाहिजेत, रंकाळ्याबरोबर परताळ्याचेही योग्य काळजी घेतली गेली पाहिजे, रंकाळ्यात जे सांडपाणी मिश्रित होते ते बंद झाले तर येथील जैवविविधता समृद्ध होऊन नवनवीन पक्षी व प्राण्यांच्या प्रजाती येथे घर करतील व ही निसर्गाची किमया आपणा सर्वांना याची देही याची डोळा पहायला मिळेल.

कसा आहे समुद्री गरुड :

  • पूर्ण वाढ झालेल्या समुद्री गरुडाचे डोके, छाती, पोट हे पांढरे शुभ्र आहे.
  • त्याची पाठ व पंख हे राखाडी रंगाचे आहेत.
  • सुमारे दोन मीटर पंखाची लांबी आहे.
  • त्याचे साडेतीन ते चार किलो वजन आहे.
  • ही गरुड प्रजाती एकपत्नी असून, एक पक्षी मरेपर्यंत जोडीने एकत्र राहतात.
  • भारत आणि श्रीलंका ते आग्नेय आशियामार्गे ऑस्ट्रेलियापर्यंतचे किनारे व प्रमुख जलमार्गावर राहतात.
  • साधारणत: त्यांचे आयुष्यमान हे २५ ते ३० वर्ष असते.


निरीक्षणे :

  • जोडी मिलनापूर्वी आकाशात उडण्याचे कौशल्यपूर्ण प्रदर्शन करतात व डायव्हिंग करतात.
  • कें कें असे जोरजोरात ओरडत संभाषण करतात.
  • घरटे कमी मानवी प्रभाव किंवा हस्तक्षेप नसलेल्या उंच झाडावर चांगली दृश्यमानता असल्याला ठिकाणी बांधतात.
  • घरटे बांधण्यात नर सक्रिय भूमिका पार पाडतो.
  • पिल्लं झाल्यावर नर खायला आणून देतो व मादी तेथेच थांबून खायला देते.
  • पिले मोठे झाल्यावर दोघेही भक्ष्य शोधण्यास जातात.

Web Title: A sea eagle takes birth near Rankala, the first incident in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.