मिरवणुकीत नाचताना टेम्पोवरून पडून एक गंभीर, कोल्हापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 11:54 AM2023-09-21T11:54:32+5:302023-09-21T11:55:01+5:30
कार्यकर्त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना पाचारण
कोल्हापूर : गणपती आगमन मिरवणुकीवेळी टेम्पोवर उभे राहून नाचताना पडल्याने दिनेश विजय शिंदे वय २६ रा. रिलायन्स मॉलजवळ लक्ष्मीपुरी कोल्हापूर हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. बुधवारी रात्री सव्वा नऊच्या दरम्यान ही घटना घडली.
लक्ष्मीपुरीतील या मॉलजवळ असणाऱ्या एकता ग्रुपच्या गणपतीची आगमन मिरवणूक सुरू होती. याच दरम्यान ध्वनियंत्रणेच्या तालावर अनेक युवक नृत्य करत होते. यावेळी दिनेश झेंडा घेऊन थांबलेल्या टेम्पोवर चढला. वर चढून तो झेंडा फिरवत नाचत असताना त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. त्याच्या डोक्याला मार लागला. कार्यकर्त्यांनी त्याला तातडीने सीपीआरमध्ये आणले. त्याला पहिल्यांदा टाके घालून नंतर सिटी स्कॅन करण्यात आले.
कार्यकर्त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना पाचारण
दरम्यान दिनेशवर उपचार करण्यास उशीर होत असल्याच्या समजातून एका कार्यकर्त्याने महिला डॉक्टरांना सुनावण्यास सुरुवात केली. ‘तुम्ही माप मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये बोलत बसाल,’ असे आवाज चढवून बोलायला त्याने सुरुवात केल्यानंतर सुरक्षा रक्षकाने त्याला बाहेर नेले. एवढ्यात पोलिसांना फोन करण्यात आला. यानंतर पोलिसांनी येऊन या घटनेमुळे आणि दुसऱ्या एका मारामारीमुळे मोठ्या संख्येने गोळा झालेल्या कार्यकर्त्यांना तेथून पिटाळले.