बांधली तिरडी, पण सीपीआरने उभारली जीवनाची गुढी: देवमाणसामुळे मिळालं जीवदान

By विश्वास पाटील | Published: December 13, 2023 02:06 PM2023-12-13T14:06:47+5:302023-12-13T14:07:25+5:30

गिरगावमधील एकास जीवनदान : खासगी दवाखान्याने जाहीर केले होते मरण

A shack was built, but CPR raised a pillar of life: God gave life in kolhapur hospital | बांधली तिरडी, पण सीपीआरने उभारली जीवनाची गुढी: देवमाणसामुळे मिळालं जीवदान

बांधली तिरडी, पण सीपीआरने उभारली जीवनाची गुढी: देवमाणसामुळे मिळालं जीवदान

कोल्हापूर : बांधली तिरडी, परंतु येथील जिल्हा रुग्णालय असलेल्या सीपीआर रुग्णालयाने त्या व्यक्तीला अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून काढून त्यांच्या जीवनाचीच जणू गुढी उभारली. हा अनुभव सैनिकांचे गिरगाव (ता. करवीर) म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावातील अर्जुन आप्पासो कुरणे (वय ५३) यांना नुकताच आला. कोल्हापुरातील नागाळा पार्कातील एका खासगी रुग्णालयाने व्हेंटिलेटर काढल्यावर ते फार काळ जगू शकणार नाहीत, असे सांगितले होते; परंतु त्याच रुग्णावर सीपीआरमध्ये उत्तम उपचार झाले आणि त्यांना जीवनदान मिळाले. कुरणे कुटुंबीयांनी सीपीआरमध्ये जाऊन उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करून अनोखी कृतज्ञता व्यक्त केली.

घडले ते असे : शेतकरी असलेले अर्जुन कुरणे यांना किरकोळ खोकला होता म्हणून बेलबागमधील दवाखान्यात दाखल केले. त्यांना फुप्फुसाला संसर्ग झाला असल्याने नागाळा पार्कातील मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. तेथे कुरणे यांच्यावर पाच दिवस उपचार झाले. त्यांचे फुप्फुस सुमारे ७० टक्के निकामी झाल्याने रुग्णाला व्हेंटिलेटर लावले. परंतु रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. दवाखान्याचे सुमारे तीन लाखांवर बिल झाले होते. औषधांचा मारा सुरूच होता. व्हेंटिलेटर काढले की ते जगूच शकणार नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितल्याने त्यांनी पेशंटला घरी न्यायचा निर्णय घेतला. पेशंटला घेऊन येत असल्याचा गावी निरोप देण्यात आला. व्हेंटिलेटर काढल्यावर जगणार नाहीत, असे डॉक्टरांनीच सांगितल्याने पैपाहुण्यांना निरोप गेले. काही कार्यकर्त्यांनी तिरडीही आणली... रुग्णवाहिकेतून घरी नेताना वाटेत पेशंटची थोडी हालचाल झाली. ती पाहून तेथेच डॉक्टरला बोलावून तपासणी केल्यावर त्यांनी पुन्हा दुसऱ्या एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात पाठवले. त्यांनी पेशंटची स्थिती पाहून अगोदर दीड लाख रुपये भरण्याचा सल्ला दिला. म्हणून त्यांनी अखेरचे प्रयत्न म्हणून पेशंटला सीपीआरला नेले. सीपीआरमधील बारा दिवसांच्या उपचारानंतर कुरणे यांची प्रकृती आता उत्तम आहे. शेतीसह दुकानाची हलकीफुलकी कामे ते आता करत आहेत. खासगी रुग्णालयाने मृत्यूच्या दाढेत ढकलले आणि सरकारी रुग्णालयाने त्यातून बाहेर काढले असाच अनुभव त्यांच्या वाट्याला आला आहे.

देवमाणसाचा प्रत्यक्ष अनुभव...

सीपीआरमध्ये त्यांच्यावर डॉ. शशी वर्मा, डॉ. आदित्य उपाध्ये यांच्यासह स्नेहल सगर, मनीषा पाटील, संपदा जाधव, अपूर्वा कीर्तने यांनी चांगले उपचार केले. रुग्णांच्या मदतीला धावून जाणारे बंटी सावंत, नीलेश मोरे यांचीही चांगली मदत झाली. या देवमाणसांमुळेच आमचे पेशंट वाचू शकले, अशी भावना कुरणे कुटुंबीयांनी लोकमतकडे व्यक्त केली.
 

Web Title: A shack was built, but CPR raised a pillar of life: God gave life in kolhapur hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.