थंडीचे आगमन, बोचऱ्या वाऱ्याने अंगात हुडहुडी; कोल्हापुरात १५ डिग्रीपर्यंत तापमान घसरले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 05:04 PM2022-10-25T17:04:06+5:302022-10-25T17:10:51+5:30
आगामी आठवडाभर तापमान कायम राहणार असल्याने थंडी वाढण्याची शक्यता
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात एकदम घसरण झाल्याने थंडी जाणवू लागली आहे. बोचऱ्या वाऱ्याने सकाळी व रात्री अंगात हुडहुडी भरत आहे. सोमवारी किमान तापमान १५ डिग्रीपर्यंत खाली आल्याने थंडी अधिक जाणवत होती. आगामी आठवडाभर तापमान कायम राहणार असल्याने थंडी वाढण्याची शक्यता आहे.
साधारणत: आपल्याकडे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून परतीच्या पाऊस संपून थंडीची चाहूल लागते. यंदा मात्र ऑक्टोबर संपत आला तरी परतीचा पाऊस पाठ सोडत नाही. दिवाळीचा सणही पावसात जाणार असेच वाटत होते. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीची चाहूल लागेल, असे वाटत असताना रविवारी रात्रीपासून वातावरणात एकदमच बदल झाला. अंगाला बोचणारे वारे वाहत आहे.
जिल्ह्याचे किमान तापमानात एकदम घसरण झाल्याने थंडी जाणवू लागली आहे. सोमवारी सकाळी तर अंगात हुडहुडी भरत होती. नदी, विहीर, ओढ्याच्या काठावरून जाताना अंगावर काटा येत आहे. साधारणत: सकाळी साडेआठ पर्यंत वातावरणात गारठा जाणवत होता. सूर्यनारायणाने दर्शन दिल्यानंतर थंडी कमी झाली. सायंकाळी साडेसहानंतर पुन्हा गारठा जाणवू लागला. रात्री त्यामध्ये वाढ होत गेली. आगामी आठवडाभर तापमानात घसरण होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.
असे राहणार तापमान, डिग्रीमध्ये -
वार किमान कमाल तापमान
मंगळवार १५ ३०
बुधवार १४ २८
गुरुवार १३ ३१
शुक्रवार १४ ३०