कोल्हापुरातील प्रति पंढरपूर नंदवाळ दिंडीत पुढील वर्षी चांदीचा रथ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 02:40 PM2024-06-28T14:40:26+5:302024-06-28T14:40:38+5:30
संयोजन समितीचा संकल्प : यंदा १७ जुलैला होणार साेहळा
कोल्हापूर : प्रति पंढरपूर नंदवाळसाठीचा माऊलींचा रथ चांदीचा करण्याचा संकल्प गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत करण्यात आला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून हा रथ साकारला जाणार असून, तो पुढील वर्षीच्या दिंडीत सहभागी असेल. यंदा १७ जुलैला सकाळी ८ वाजता मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरापासून पायी दिंडी सोहळ्याला प्रारंभ होईल, पूर्वसंध्येला भवानी मंडप येथे नगर प्रदक्षिणा होईल, अशी माहिती श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळाचे उपाध्यक्ष दीपक गौड यांनी दिली.
प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या नंदवाळसाठी दरवर्षी आषाढी एकादशी दिवशी दिंडी निघते. यानिमित्त भक्त मंडळाची नियोजन बैठक मिरजकर तिकटी येथील मंदिरात पार पडली. यंदा एकादशी १७ जुलै रोजी आहे. त्यादिवशी सकाळी ८ वाजता दिंडी नंदवाळसाठी प्रस्थान करेल. खंडोबा तालीम येथे उभे पहिले रिंगण होईल. त्यानंतर पुईखडी येथे मोठे गोल रिंगण सोहळा होईल. आदल्या दिवशी म्हणजेच १६ तारखेला सायंकाळी महाद्वार रोड, जोतिबा रोड, भाऊसिंगजी रोडवरून नगर प्रदक्षिणा निघेल. भवानी मंडप येथे रिंगण सोहळा होईल.
यंदा वारीचे २१ वे वर्ष असून, माऊलींचा रथ चांदीचा बनविण्यात येणार आहे. त्यासाठी नव्याने सागवानी रथ तयार करण्यात आला आहे. त्यावरील चांदीच्या कलाकुसरीचे काम दिंडीनंतर केले जाईल. बैठकीला दिंडीप्रमुख हभप आनंदराव लाड महाराज, समिती अध्यक्ष बाळासाहेब पोवार, एम.पी. पाटील-कावणेकर, सखाराम चव्हाण, संभाजी पाटील, भगवान तिवले यांच्यासह सदस्य उपस्थित होते.