Kolhapur: नोकरी असतानाही क्लास घेणाऱ्या माध्यमिक शिक्षकांचे होणार स्टिंग ऑपरेशन
By समीर देशपांडे | Published: October 11, 2023 02:22 PM2023-10-11T14:22:47+5:302023-10-11T14:23:27+5:30
कोल्हापूर माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात नोकरी करतानाही खासगी क्लास घेणाऱ्या माध्यमिक शिक्षकांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षणाधिकारी ...
कोल्हापूर माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात नोकरी करतानाही खासगी क्लास घेणाऱ्या माध्यमिक शिक्षकांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ .एकनाथ आंबोकर यांनी घेतला आहे. असोसिएशन ऑफ महाराष्ट्र कोचिंग क्लासेसच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी बुधवारी ही ग्वाही दिली.
असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. आंबोकर यांची भेट घेऊन त्यांना दुसऱ्यांदा निवेदन दिले. २६ एप्रिल २००० ला महाराष्ट्र शासनाने काढलेल्या परिपत्रकात असे क्लासेस घेण्यास बंदी आहे. तरीही अनेक शाळा, महाविद्यालयांतील शिक्षक शाळा, महाविद्यालयांत शासनमान्य अनुदानित पगार घेत असताना स्वतंत्र खासगी क्लास कॉलेज, शाळेच्या जवळपास चालवतात. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलच्या गुणांचे आमिष दाखवतात. याबाबत वेळोवेळी कॉलेजचे प्राचार्य, संस्थापक अध्यक्षांना व शिक्षण उपसंचालक यांच्याकडे रजिस्टर एडीने ४ ऑगस्ट रोजी तक्रारी केल्या आहेत. परंतु याबाबत कोणीही कारवाई न होता त्यांना पाठीशी घातले जात आहे, असे यावेळी चर्चेत सांगण्यात आले.
चंद्रकांत यादव, प्रा. सुभाष देसाई, बी. एस. पाटील, अतुल निंगुरे, उदय शिपेकर, प्रकाश मोरे, संभाजी सावंत, रितेश दलाल, अमित निगवेकर, विद्यानंद उपाध्ये, नारायण निळपणकर, किरण मोळे यांनी डॉ. आंबोकर यांना यावेळी निवेदन दिले.
क्लासेसच्या पत्त्यासह दिली यादी
कोचिंग क्लासेसच्या पदाधिकाऱ्यांनी ११ सप्टेंबर रोजी डॉ. आंबोकर यांना दिलेल्या निवेदनात ९ शिक्षकांची नावे घालून निवेदन दिले आहे. यात त्यांनी तक्ताच तयार केला असून, यामध्ये शाळा, महाविद्यालयांचे नाव, शिक्षकांचे नाव आणि क्लास घेत असलेला पत्ता अशी सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, नागाळा पार्कातील नामवंत शाळा, महाविद्यालयांतील शिक्षकांचा समावेश आहे.