अंध तरुणांचा संघ हिमालयातील ट्रेकसाठी रवाना; पश्चिम महाराष्ट्रातील तरुणांचा समावेश
By संदीप आडनाईक | Published: May 18, 2024 02:13 PM2024-05-18T14:13:16+5:302024-05-18T14:14:35+5:30
कोल्हापूर : पुण्यातील स्वरूपसेवा, गिरीप्रेमी आणि लव्ह केअर शेअर फाउंडेशन यांच्यातर्फे ‘ममता अंध अनाथ कल्याण केंद्र’ येथील २२ अंध ...
कोल्हापूर : पुण्यातील स्वरूपसेवा, गिरीप्रेमी आणि लव्ह केअर शेअर फाउंडेशन यांच्यातर्फे ‘ममता अंध अनाथ कल्याण केंद्र’ येथील २२ अंध तरुणांचा संघ शुक्रवारी हिमालयाच्या सफरीवर रेल्वेने रवाना झाला. यामध्ये कोल्हापूर, कऱ्हाड, सातारा येथील तरुणांचा समावेश आहे.
पुण्याहून हा संघ दिल्लीला पोहोचेल व तेथून हिमाचल प्रदेशातील ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा असलेल्या नग्गर या गावामध्ये तीन दिवस मुक्काम करणार आहे. दूरच्या रेल्वे प्रवासातील मजा, हिमालयातील थंड वातावरणाचा अनुभव, हिमालयातील एक छोटा ट्रेक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद हे तरुण या हिमालयातील सफरीदरम्यान घेणार आहेत. कोल्हापुरातील शरद पाटील, कऱ्हाड येथील प्रसाद शरद पाटील तसेच सातारा येथील गणेश हनुमंत निंबाळकर या अंध तरुणांचा या सफरीत समावेश आहे.
गिरीप्रेमी संस्थेतील अनुभवी गिर्यारोहक, स्वरूपसेवा आणि लव्ह केअर शेअर फाउंडेशनमधील स्वयंसेवक या अंध तरुणांना हिमालयाची ही अनोखी सफर घडवून आणण्यामध्ये मदत करणार आहेत. गिरीप्रेमीचे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे आणि स्वरूपसेवा संस्थेचे अध्यक्ष अजित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेची तयारी झाली आहे.