बोगस प्रतिज्ञापत्रे प्रकरण: मुंबई पोलिसांचा चौकशीसाठी हातकणंगले, शिरोळ भागात ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 12:01 PM2022-10-14T12:01:49+5:302022-10-14T12:02:17+5:30
संशयित व्यक्तीच्या नावे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील शिक्के व स्वाक्षरीमध्ये तफावतीचा संशय पोलीस पथकास आला आहे, अशा व्यक्तींना शोधून त्यांची भेट घेऊन थेट चौकशी सुरू असल्याचेही समजते.
कोल्हापूर : शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांपैकी काही प्रतिज्ञापत्रे बोगस असल्याच्या संशयावरून चौकशीसाठी मुंबई क्राइम ब्रँचच्या पथकाने हातकणंगले व शिरोळ भागात ठिय्या मारला. जिल्ह्यातून सादर झालेल्या प्रतिज्ञापत्रांपैकी तब्बल १४०० प्रतिज्ञापत्रे बोगस असल्याचा संशय पथकास आहे. प्रतिज्ञापत्रावरील शिक्के, स्वाक्षरीमध्ये तफावत असल्याचे चौकशीत पुढे आले. त्यामुळे नेत्यांसह शिवसैनिक चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातर्फे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १४०० प्रतिज्ञापत्रावर शिक्के व स्वाक्षरीमध्ये तफावत आढळली. त्यामुळे मुंबई क्राइम ब्रँचच्या पथकाने कोल्हापुरात येऊन बुधवारपासून चौकशी सुरू केली आहे. कोल्हापूर शहरात काही तर हातकणंगले व शिरोळमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस प्रतिज्ञापत्र असल्याचा संशय पथकाने व्यक्त केला आहे.
अनेक प्रतिज्ञापत्रे मृत व्यक्तीच्या तसेच अस्तित्वात नसलेल्यांच्या नावे असल्याचे चौकशीत पुढे आल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे पथक सखोलपणे चौकशी करत आहे. ही चौकशी आणखी काही दिवस चालणार असल्याचेही पथकातील एकाने सांगितले. काही संशयित बाबी चव्हाट्यावर आल्याने काही शिवसैनिक व नेते चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. या चौकशीमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.
थेट भेट, चौकशी
संशयित व्यक्तीच्या नावे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील शिक्के व स्वाक्षरीमध्ये तफावतीचा संशय पोलीस पथकास आला आहे, अशा व्यक्तींना शोधून त्यांची भेट घेऊन थेट चौकशी सुरू असल्याचेही समजते.