Kolhapur: हँडेल लॉक तोडून ११ दुचाकी लंपास; दुचाकी चोरतानाच सापडला कर्नाटकातील चोरटा
By उद्धव गोडसे | Published: May 27, 2024 02:23 PM2024-05-27T14:23:24+5:302024-05-27T14:23:41+5:30
शाहूपुरी पोलिसांची कारवाई
कोल्हापूर : हँडेल लॉक तोडून दुचाकी लंपास करणारा चोरटा रमेश रवींद्र माने (वय २५, रा. पडलीहाळ, ता. निपाणी, जि. बेळगाव) याला शाहूपुरी पोलिसांनी राजर्षी शाहू मार्केट यार्ड येथून रविवारी (दि. २६) दुपारी अटक केली.
माने हा चोरीसाठी दुचाकींची पाहणी करतानाच पोलिसांच्या हाती लागला. कोल्हापूरसह सांगली आणि बेळगाव जिल्ह्यातून गेल्या सहा महिन्यांत ११ दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली असून, चोरीतील सुमारे साडेपाच लाखांच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.
शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा कर्नाटकातील दुचाकी चोरटा रमेश माने याचे १२ वी पर्यंत शिक्षण झाले असून, तो तीन वर्षांपूर्वी इचलकरंजीत शहापूर येथे राहत होता. आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्याने दुचाकींची चोरी करून त्या कमी किमतीत विकण्याची शक्कल लढवली. त्यानुसार इस्लामपूर (जि. सांगली) एसटी स्टँड, मिरज येथील मिशन हॉस्पिटल, मंगसुळी देवस्थान (जि. बेळगाव), हुक्कीरी, बेळगाव येथील के.एल.ई. हॉस्पिटल, सांगली बस स्टँड येथून दुचाकींची चोरी केली.
हँडेल लॉक तोडून बनावट चावीने दुचाकी सुरू करून तो काही क्षणात निघून जायचा. संशयित चोरटा मार्केट यार्ड येथे येणार असल्याची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार विशाल मुळे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. ही कारवाई मुळे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार संदीप जाधव, कॉन्स्टेबल महेश पाटील, मिलिंद बांगर, शुभम संकपाळ, संदीप बेंद्रे, बाबा ढाकणे, रवी आंबेकर, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
विक्रीसाठी मित्रांकडे दिल्या दुचाकी
माने याने चोरलेल्या दुचाकी विक्रीसाठी सादिक तैवार (रा. शहापूर) आणि ओंकार चोपडे (रा. गोरंबे, ता. कागल) या दोघांकडे दिल्या होत्या. कागदपत्रे नंतर देण्याचे कबूल करून त्याने १० ते १५ हजार रुपयांत एका दुचाकीची विक्री करण्यास मित्रांना सांगितले होते. गाड्यांची विक्री होण्यापूर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.