कोल्हापुरातील वास्तूंच्या चित्रांचा १६७ वर्षांपूर्वीचा खजिना गवसला, पूर्वी शहरात कुठून होता प्रवेश..जाणून घ्या
By समीर देशपांडे | Updated: April 21, 2025 13:48 IST2025-04-21T13:47:53+5:302025-04-21T13:48:41+5:30
हेरिटेज सोसायटी ऑफ कोल्हापूरच्या प्रयत्नांना यश

कोल्हापुरातील वास्तूंच्या चित्रांचा १६७ वर्षांपूर्वीचा खजिना गवसला, पूर्वी शहरात कुठून होता प्रवेश..जाणून घ्या
समीर देशपांडे
कोल्हापूर : करवीर किल्ला बहु रंगेल, हाय पंचगंगेच्या तीरी महातीर्थांची महिमा सांगतो गाजती तीर्थ भारी असा शाहीर सुलतानजी पाटील यांच्या कंपूचा पोवाड्यात कोल्हापूरच्या कोटाचा उल्लेख येतो. एकेकाळी कोल्हापूर शहराला तटबंदी होती आणि तटबंदीच्या आतील शहराला कोट कोल्हापूर म्हणत. तर ब्रिटिश त्यालाच कोल्हापूर फोर्ट म्हणत असत. या तटबंदीला ६ वेशी म्हणजे दरवाजे होते.
त्यापैकीचा एकच दरवाजा आज बिंदू चौकात शिल्लक आहे ज्याला एकेकाळी रविवार वेस म्हटले जाई. अशाच शुक्रवार दरवाजासह भावसिंगजी रोड, पदमाळ्याजवळील महाराजांचा वाडा आणि सोनतळीचा बंगल्यांची १६७ वर्षांपूर्वी चितारलेली चित्रे आता उपलब्ध झाली आहेत.
लेफ्टनंट वॉडबाय हे ब्रिटिश अधिकारी १८५८ ते १८५९ या वर्षांत कोल्हापूरमध्ये होते, त्यांना चित्रकलेची अतिशय आवड होती त्यांनी कोल्हापूर आणि परिसराची अनेक चित्रे काढली होती. त्यांच्या या चित्रांचा शोध घेण्यासाठी हेरिटेज सोसायटीच्या राहुल माळी, भारत महारुगडे आणि यशोधन जोशी यांचे गेली दोन वर्षे प्रयत्न सुरू होते. त्याला यश आले आहे.
कोल्हापूरची वाढ व्हावी म्हणून १८८०च्या दशकात कोटाभोवतीची तटबंदी उतरवण्यात आली आणि हे दरवाजेही नाहीसे झाले. त्यामुळे अन्य दरवाजे कसे होते याचे औत्सुक्य होते. त्यातील शुक्रवार वेस, पन्हाळ्याकडून कोल्हापुरात येताना कोल्हापूरच्या बाहेरच्या भागात एक प्रवासी बंगला (ट्रॅव्हलर्स बंगलो) होता तो बंगला म्हणजेच सोनतळी येथील स्काऊट बंगला, पदमाळा तलावाजवळ असाच एक वाडा होता तो आता अस्तित्वात नसला तरी वॉडबायने काढलेल्या चित्रामुळे त्याचे अस्तित्व आपल्याला समजते असे यशोधन जोशी यांनी सांगितले. या चित्रांमध्ये नगारखान्यापासून सुरू होणाऱ्या भावसिंगजी रस्त्याचेही चित्र रेखाटण्यात आले आहे.
पूर्वी शुक्रवार पेठेतूनच होता शहरात प्रवेश
उत्तरेकडून कोल्हापुरात येताना ही शुक्रवार वेस ओलांडूनच शहरात प्रवेश करावा लागत असे. १८७८ साली झालेल्या महादजी शिंदे यांच्या कोल्हापूर स्वारीच्या वेळीही महादजी शिंदेंनी शुक्रवार वेशीच्या बाहेरून मोर्चे बांधल्याचे उल्लेख सापडतात. त्याचबरोबर पटवर्धन आणि छत्रपती यांच्यातील लढाईचे वर्णन करणाऱ्या कंपूच्या पोवाड्यातसुद्धा शुक्रवार वेशीपाशी झालेल्या हातघाईचा उल्लेख आहे. अशा या वेसीचे चित्र आता उपलब्ध झाले आहे. कोल्हापूरमध्ये येण्याचा जुना मार्ग हा पन्हाळ्याच्या रस्त्याने होता, १८६६ नंतर पुणे-कोल्हापूर हा आजचा रस्ता तयार झाला आणि तिकडून वाहतूक सुरू झाली.
वॉडबाय यांची काही चित्रे ऑस्ट्रेलियातील संग्रहालयात आहेत याबद्दल मला माहिती समजली. या चित्रांसंदर्भात संग्रहालयाशी संपर्क साधून ती मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले. याच दरम्यान वॉडबायच्या वंशजांचाही शोध घेतला आणि त्यांच्या तसेच संग्रहालयाच्या मदतीने ही चित्रे मिळविण्यात यश आले. - यशोधन जोशी