पन्हाळ गडावरील शिवजयंती उत्सवारून परतताना दुचाकीला अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू
By उद्धव गोडसे | Published: February 19, 2023 02:14 PM2023-02-19T14:14:55+5:302023-02-19T14:15:16+5:30
या अपघातात संतोष आणि अक्षय यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर काही नागरिकांनी कदम दाम्पत्यासह नीलेश संकपाळ या तिघांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.
कोल्हापूर : पन्हाळ गडावरील शिवजयंतीचा उत्साह अनुभवण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांचा परतताना रजपूतवाडीजवळ अपघात झाला. दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली.
संतोष बाळासाहेब पाटील (वय ३४, रा. साळुंखे मळा, कदमवाडी, कोल्हापूर) आणि अक्षय सुरेश पाडळकर (वय २४, रा. भोसलेवाडी, हनुमान मंदिराजवळ, कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. नीलेश रवींद्र संकपाळ (वय ३४, रा. कदमवाडी, विठ्ठल मंदिराजवळ, कोल्हापूर), जयदीप जनार्दन कदम (वय ४५) आणि सुवर्णा जयदीप कदम (वय ४०, दोघेही रा. लक्ष्मी कॉलनी, टेंबलाईवाडी, कोल्हापूर) या जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळ आणि करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष पाटील, अक्षय पाडळकर आणि नीलेश संकपाळ हे तिघे मित्र पन्हाळ्यावरील शिवजयंतीचे वातावरण पाहण्यासाठी शनिवारी (दि. १८) रात्री उशिरा एकाच दुचाकीवरून पन्हाळ्याला गेले होते. रविवारी सकाळी ते परत येत होते. दरम्यान, रविवारी सकाळी टेंबलाईवाडीतील कदम दाम्पत्य जोतिबा डोंगरावर खेट्यासाठी त्यांच्या दुचाकीवरून निघाले होते. रजपूतवाडीच्या हद्दीत सई हॉटेलजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली.
या अपघातात संतोष आणि अक्षय यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर काही नागरिकांनी कदम दाम्पत्यासह नीलेश संकपाळ या तिघांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. प्रथमोपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवले.
मृत संतोष पाटील याच्या पश्चात ८० वर्षांची आजी आणि विवाहित बहीण आहे. १५ वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा, तर १७ वर्षांपूर्वी त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी दोनवेळा झालेल्या अपघातातून संतोष बचावला होता. मृत अक्षय याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. संतोष, अक्षय आणि नीलेश हे तिघेही चांगले मित्र होते. ते गोकुळ शिरगाव एमआयडीसीत एकाच कंपनीत कामाला होते. अपघातात दोन उमदे तरुण दगावल्यामुळे कदमवाडी आणि भोसलेवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. मृतांच्या नातेवाईकांनी सीपीआरच्या अपघात विभागासमोर गर्दी केली होती. अपघाताची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.