कोल्हापुरातील वाजत-गाजत नेलेली २१ लाखाची दुचाकी जळून खाक, चौगुले कुटुंबीयांना बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 01:25 PM2022-11-11T13:25:16+5:302022-11-11T13:25:41+5:30
या घटनेने परिसरात उडाली एकच खळबळ
अमर पाटील
कळंबा : दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर एक महिन्यापूर्वीच सुर्वेनगर प्रभागातील दत्त जनाई नगरमधील युवकाने मोठ्या हौसेने वाजत-गाजत २१ लाखाची दुचाकी घरी नेली होती. ही दुचाकीबघायला नागरिकांनी मोठी गर्दी देखील केली होती. तीच २१ लाखाची दुचाकी आगीत जळून खाक झाली. या दुचाकीसह एक कारही जळाली. आज, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घटलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, ही आग नेमकी कशी लागली? की अज्ञातांनी लावली याबाबत गूढ कायम आहे.
याबाबत दुचाकीची मालक राजेश आनंदराव चौगुले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वरून पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राजेश चौगुले यांनी दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर निंजा झेडएक्क्स आर १० ही २१ लाखांची स्पोर्ट्स बाईक खरेदी केली होती. वाजत-गाजत मिरवणूक काढून त्यांनी ही दुचाकी घरी नेली होती. यामुळे उपनगरासह परिसरात ही गाडी चर्चेचा विषय ठरली होती. महिन्याच्या आत आज, शुक्रवारी पहाटे २१ लाखाच्या या दुचाकीसह कार आगीत जळून खाक झाली. आगीने उग्र रूप धारण केल्याने आग आटोक्यात आणणे आवाक्याबाहेर गेले होते. गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने निव्वळ सांगाडे शिल्लक राहिले होते. आग लागली की अज्ञातांनी आग लावली हे स्पष्ट होत नसल्याने चौगुले कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.