लग्नासाठी नवरी मिळालीच पाहिजे, कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे; हटके मागण्या करत काढली अनोखी रॅली
By संदीप आडनाईक | Published: February 7, 2024 12:51 PM2024-02-07T12:51:16+5:302024-02-07T12:51:31+5:30
कोल्हापूर : ‘लग्नासाठी नवरी मिळालीच पाहिजे’, ‘कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे’, ‘पेट्रोल फुकट मिळालेच पाहिजे’, ‘हवेवर गाड्या चालल्याच पाहिजेत’ अशा ...
कोल्हापूर : ‘लग्नासाठी नवरी मिळालीच पाहिजे’, ‘कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे’, ‘पेट्रोल फुकट मिळालेच पाहिजे’, ‘हवेवर गाड्या चालल्याच पाहिजेत’ अशा हटके मागण्या कोणी केल्या असतील तर त्या कोल्हापूरकरांनीच. कोल्हापूरकर प्रबोधनासाठी आणि आंदोलनासाठी अशा युक्त्या केव्हा वापरतील याचा नेम नाही.
आता साधा ‘सायकल चालवा, प्रदूषण टाळा’ असा सरळधोपट प्रचार करण्याऐवजी अनेक गमतीदार फलक लावून खासबाग मैदानापासून चिखली, प्रयाग तीर्थक्षेत्रापर्यंत निघालेल्या या अनोख्या सायकल रॅलीमध्ये हौशी लहान मुलांपासून ज्येष्ठांचा सहभाग होता. या रॅलीची चर्चा केवळ कोल्हापूरकरांमध्येच नव्हती, तर सोशल मीडियावरच्या युजर्सनीही या व्हिडीओंना चांगलाच प्रतिसाद दिला.
वधूच्या पोशाखातील माधुरी दीक्षितची आरती ओवाळून या आगळ्या-वेगळ्या सायकल रॅलीला सोमवारी खासबाग मैदानाजवळून प्रारंभ झाला. पिपाण्या वाजवीत, ढोल बडवत, बंबात लाकूड गुळगुळीत, आबा घुमीव, ह्योच नवरा पाहिजे, एकच मासा, गाडगाभर रस्सा अशा फलक लावलेल्या सायकली घेऊन दुपारी १२ वाजता मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, कुंभार गल्ली, तोरस्कर चौक, आंबेवाडी, चिखली, प्रयाग तीर्थक्षेत्र आणि परत खासबाग मैदान या मार्गावर ही रॅली निघाली.
नेहमी नागरी प्रश्नांचे विषय गमतीदार पद्धतीने मांडून लोकप्रबोधन करणाऱ्या पुरस्कृत पॉवरफुल्ल चिक्कू मंडळाने ही रॅली काढली. चिक्कूनगरचा मोठा नामफलक लावलेली रिक्षा अग्रभागी होती. सायकल वापरावी, प्रदूषण टाळावे, आरोग्य चांगले राहावे यासाठीचा संदेश अनोख्या पद्धतीने देणाऱ्या या उपक्रमाचे आयोजन अशोक पवार, सचिन साबळे, जयदेव बोरपाळकर, राजेश गायकवाड, विश्वनाथ पोवार, श्रीधर जाधव, रामभाऊ जगताप, अभिजित पोवार यांनी केले होते.