कोल्हापुरात जि. प शाळेत साकारले अनोखे शिवतीर्थ सभागृह, लोकसहभागातून निर्मिती - video
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 04:37 PM2024-09-03T16:37:44+5:302024-09-03T16:38:02+5:30
राजेंद्र पाटील प्रयाग चिखली : जिजाऊंची शिकवण, स्वराज्याची शपथ, अफजलखानाचा वध, कोंढाण्याची लढाई, पावनखिंडीचा रणसंग्राम, शाहिस्तेखानाची फजिती, आग्र्याहून सुटका, ...
राजेंद्र पाटील
प्रयाग चिखली : जिजाऊंची शिकवण, स्वराज्याची शपथ, अफजलखानाचा वध, कोंढाण्याची लढाई, पावनखिंडीचा रणसंग्राम, शाहिस्तेखानाची फजिती, आग्र्याहून सुटका, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा सन्मान असे विविध प्रसंग सभागृहाच्या भिंतीवर चितारण्यात आले आहेत.
वरणगेच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील शिवतीर्थ सभागृहाच्या उभारणीची. शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमर पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सभागृहनिर्मितीचा निर्धार केला. समितीचे व ग्रामपंचायतचे सदस्य प्रा. राजेंद्र पाटील व अध्यक्ष अमर पाटील यांनी सभागृहामध्ये शिवचरित्राची संकल्पना मांडली. मुख्याध्यापक यशवंत चौगले व समिती सदस्यांना ही संकल्पना आवडली. यानंतर अमर पाटील व शाळा व्यवस्थापन समितीने पालक व ग्रामस्थांना आवाहन केल्यानंतर लोकांनी उत्स्फूर्तपणे मदत करण्यास सुरुवात केली. सुमारे दोन लाख साठ हजार इतकी रक्कम जमा झाली व अवतरले एक अनोखे शिवतीर्थ सभागृह.
या सभागृहाचे नुकतेच पालक व मान्यवरांच्या उपस्थितीत एका भव्य समारंभाद्वारे लोकार्पण झाले. उद्घाटन सरपंच युवराज शिंदे, अध्यक्ष अमर पाटील, उपसरपंच पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष संदीप आंबी, मुख्याध्यापक यशवंत चौगुले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक यशवंत चौगुले यांनी केले. अध्यक्ष अमर पाटील, सदस्य प्रा राजेंद्र पाटील, तानाजी आंग्रे, संदीप शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली. गटशिक्षणाधिकारी समरजित पाटील यांनी व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक व गावकऱ्यांचे यावेळी कौतुक केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची खऱ्या अर्थाने ओळख विद्यार्थ्यांना व्हावी व शिवगुणांचे संक्रमण व संवर्धन विद्यार्थ्यांमध्ये व्हावे या उद्देशाने पालक, शिक्षक, ग्रामस्थ व व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने लोकसहभागातून हे शिवतीर्थ सभागृह उभारले. -अमर पाटील, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती वरणगे.
शिवतीर्थ सभागृहाच्या माध्यमातून व्यवस्थापन समितीने व शिक्षकांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. -वाय. डी. देसाई, पालक.