'महर्षी शिंदे यांच्याकडून समाजाला वैश्विक दृष्टी', शिवाजी विद्यापीठात विशेष टपालाचे प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 02:05 PM2023-01-03T14:05:21+5:302023-01-03T14:06:02+5:30

आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत महर्षी शिंदे यांनी महत्त्वाचे योगदान दिले

A Universal Vision of Society from Maharishi Shinde, Shivaji University Special Post Publication | 'महर्षी शिंदे यांच्याकडून समाजाला वैश्विक दृष्टी', शिवाजी विद्यापीठात विशेष टपालाचे प्रकाशन

'महर्षी शिंदे यांच्याकडून समाजाला वैश्विक दृष्टी', शिवाजी विद्यापीठात विशेष टपालाचे प्रकाशन

Next

कोल्हापूर : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या विचारकार्यातून समाजाला वैश्विक दृष्टी दिली, असे गौरवोद्गार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. जनार्दन वाघमारे यांनी सोमवारी येथे काढले. छत्रपती शाहू महाराज आणि गोव्याचे टपाल विभागाचे पोस्टमास्तर जायभाये यांच्या हस्ते महर्षी शिंदे यांच्या नावच्या विशेष टपालाचे प्रकाशन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाघमारे बोलत होते.

डॉ. वाघमारे म्हणाले, महर्षींनी सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास केला. यातून समाजाला धर्मचिकित्सेची गरज आहे. भारतीय टपाल विभाग आणि शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन यांच्यातर्फे हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. छत्रपती शाहू महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, टपाल विभागाचे अर्जुन इंगळे उपस्थित होते.

गोवा विभागाचे पोस्टमास्तर आर. के. जायभाये म्हणाले, आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत महर्षी शिंदे यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे, म्हणून त्यांचा टपाल विभाग गौरव करीत आहे. देशातील अनेक महनीय व्यक्ती, स्थळे, वनस्पती, प्राणी, पक्षी यांच्यासंदर्भात विशेष संदेश देण्यासाठी खात्याने वेळोवेळी अशी पाकिटे काढली आहेत. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, महर्षी शिंदे यांच्या कार्याचा अभ्यास होण्याच्या दृष्टीने विद्यापीठाचे अध्यासन कार्यरत आहे. समाज परिवर्तनासाठी महर्षी शिंदे यांच्या विचारांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

महर्षी शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अध्यासन समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. मराठी अधिविभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी परिचय करून दिला. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. राजन गवस, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. प्रकाश पवार, डॉ. अरुण शिंदे, सुरेश शिपूरकर, उपस्थित होते. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. राजेश पाटील यांनी आभार मानले.

Web Title: A Universal Vision of Society from Maharishi Shinde, Shivaji University Special Post Publication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.