कोल्हापुरात सापडले कोंबडीचे भले मोठे अंडे, देशातील सर्वात मोठे अंडे असल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 04:37 PM2022-10-18T16:37:28+5:302022-10-18T16:37:53+5:30
१०० ते १५० ग्रॅम पर्यंत वजनाची अंडी आतापर्यंत बहुदा सर्वत्र आढळतात
दिलीप चरणे
नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील दिलीप महादेव चव्हाण यांच्या पोल्ट्रीतील एका कोंबडीने चक्क २१० ग्रॅम वजनाचे भले मोठे अंडे देऊन संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. आपल्या पोल्ट्रीतील कोंबडीने एवढे 'मोठे अंडे' दिलेले पाहून पोल्ट्री मालक अवाक् झालेत. या अंड्याची रेकॉर्ड बुक नोंद होण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे. हे अंडे पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.
तळसंदे येथील दिलीप चव्हाण यांची तळसंदे - वारणानदी रस्त्याला चव्हाण मळा येथे कोंबड्यांची पोल्ट्री आहे. गेली ३८ वर्षे ते या पोल्ट्री व्यवसायात असल्याने कोंबडी व अंडी या विषयांची त्यांना चांगलीच जाण आहे. काल रविवार रात्री एका कोंबडीने एक मोठे अंडे दिल्याचे दिलीप चव्हाण यांच्या निदर्शनास आले. त्यांच्या नजरेत इतके मोठे अंडे पहिल्यांदाच पाहायला मिळाले. त्यांनी प्रथम मोजपट्टीच्या साह्याने या अंड्याचे मोजमाप घेतले. इतर अंड्यांशी त्याची तुलना केली. त्यानंतर त्यांनी इतर अंडीही मापून पाहिलीत. तथापि हे अंडे मोठे असल्याने त्यांनी त्याचे वजन केले.
लिम्का बुक ऑफ रेकोर्ड नुसार आजपर्यंत भारतात जास्तीत जास्त १६२ ग्रॅम तर जागतिक स्तरावर ५०० ग्रॅम चे अंडे आढळून आले आहे. पोल्ट्री व अंडी व्यवसायातील तज्ञांच्या मतानुसार भारतात १०० ते १५० ग्रॅम पर्यंत वजनाची अंडी आतापर्यंत बहुदा सर्वत्र आढळतात. त्यांनी त्यांच्या पोल्ट्रीत आढळलेल्या अंड्याचे वजन केले तर ते रविवारी रात्री २०० ग्रॅम तर तेच अंडे आज सोमवारी दुपारी २१० ग्रॅम भरले. हवामानाच्या बदलामुळे दहा ग्रॅमचा फरक पडला असल्याचे मत दिलीप चव्हाण यांनी व्यक्त केले. हे देशातील कोंबडीचे सर्वात मोठे अंडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.