कोल्हापुरात खासबाग मैदानाची ३० फूट उंचीची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू, सुदैवाने एक महिला बचावली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 12:01 PM2023-07-26T12:01:34+5:302023-07-26T12:01:48+5:30

जिरवणीचा पाऊस मातीत मुरल्याने दुर्घटना : जखमीवर सीपीआरमध्ये उपचार

A woman died after a 30 feet high wall collapsed in Khasbag Maidan in Kolhapur | कोल्हापुरात खासबाग मैदानाची ३० फूट उंचीची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू, सुदैवाने एक महिला बचावली

कोल्हापुरात खासबाग मैदानाची ३० फूट उंचीची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू, सुदैवाने एक महिला बचावली

googlenewsNext

कोल्हापूर : संततधार सुरू असलेल्या पावसाने खासबाग मैदानाच्या तटबंदीची भिंत कोसळून दगड आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन महिलांपैकी एका महिलेचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. ही घटना मंगळवारी (दि. २५) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास केशवराव भोसले नाट्यगृहाच्या शौचालयामागे घडली. अश्विनी आनंदा यादव (वय ५९, रा. साई पार्क, भोसलेवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. संध्या प्रशांत तेली (वय ३०, रा. वडणगे, ता. करवीर) या जखमी आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास केशवराव भोसले नाट्यगृहाच्या स्वच्छतागृहामागे अश्विनी यादव आणि संध्या तेली या दोघी लघुशंकेसाठी गेल्या होत्या. त्याचवेळी खासबाग मैदानाची सुमारे ४० मीटर लांबीची भिंत कोसळल्याने दोघी दगड आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्या. हा सर्व प्रकार तेली यांच्या पाच वर्षीय दिशा तेली या मुलीने काही अंतरावरून पाहिला. घाबरलेल्या मुलीने आईला हाक मारली. मात्र, मातीच्या ढिगाऱ्याखालून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने ती रडू लागली. भिंत पडल्याचे लक्षात येताच जवळच पार्क केलेल्या एका टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाने धाव घेतली. रडत थांबलेल्या मुलीने तिच्या आईसह दोघी मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगितले. त्यानंतर बचावकार्याला सुरुवात झाली.

महानगरपालिकेचे अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. भिंत कोसळलेली जागा अरुंद असल्याने खोरे आणि कुदळीने दगड, माती हटवून दोन्ही महिलांना बाहेर काढले. सहा वाजून ५० मिनिटांच्या सुमारास अश्विनी यादव यांना बाहेर काढून १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी टिमोथी कोगनुळकर यांनी जाहीर केले.

सव्वासातच्या सुमारास संध्या तेली यांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले. त्यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. आमदार ऋतुराज पाटील, सीपीआरच्या अधिष्ठाता आरती घोरपडे, वैद्यकीय अधीक्षक गिरीश कांबळे यांनी जखमीची विचारपूस केली. मृत यादव यांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. घटनास्थळी शहर पोलिस उपाधीक्षक अजित टिके, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीशकुमार गुरव यांच्यासह महापालिकेच्या अधिकारी उपस्थित होते.

अंगावर तीन फूट दगड, मातीचा थर

भिंत कोळताच दोघींनी चिंचोळ्या जागेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही क्षणात त्यांच्या अंगावर सुमारे तीन फूट उंचीचा दगडमातीचा थर पडला. यादव यांच्या अंगावर मोठे दगड पडल्याने त्या दबल्या गेल्या. पुरेसा ऑक्सिजन न मिळल्याने त्या गुदमरल्या. तेली यांचे डोके वरच्या दिशेला राहिल्याने त्या बचावल्या.

कुुटुंबीयांचा आक्रोश

अश्विनी यादव यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. त्यांचे पती निवृत्त शिक्षक आहेत. एक मुलगा पोलिस उपनिरीक्षक आहे, तर दुसरा मुलगा इंजिनिअर आहे. भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी सीपीआरच्या आवारात आक्रोश केला.

तेली यांनी जोडले हात

बचाव पथकांनी सुखरूप बाहेर काढताच तेली यांनी हात जोडून सर्वांचे आभार मानले. त्यांना व्यवस्थित बोलताही येत नव्हते. वेळीच झालेल्या मदतीमुळे जीव वाचल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तेली यांना सुखरूप बाहेर काढताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून बचाव पथकांच्या कामाचे कौतुक केले.

लेकीमुळे आईला जीवदान...

दोन महिला व दिशा तेली ही चिमुकली अशा एकदमच लघुशंकेसाठी गेल्या होत्या; परंतु भिंत कोसळताना पाहून दिशा मागे पळाली. आपली आई ढिगाऱ्याखाली सापडल्याचे तिनेच रडत रडत सांगितल्याने तातडीने बचाव कार्य सुुरू झाले व तिची आईला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. घटनेनंतर दिशा कमालीची घाबरली होती.

पोलिसांचे आवाहन

खासबाग मैदानाच्या तटबंदीची भिंत कोसळल्यानंतर मैदानाच्या भिंतीलगत असलेली दुकाने, फेरीवाले, रहिवासी आणि नागरिकांना भिंतीपासून दूर राहण्याच्या सूचना जुना राजवाडा पोलिसांनी दिल्या. कोणतीही वित्त आणि जीवितहानी होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन निरीक्षक सतीशकुमार गुरव यांनी केले.

Web Title: A woman died after a 30 feet high wall collapsed in Khasbag Maidan in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.