कोल्हापुरातील कसबा बीड येथे शेतमजूर महिलेला सापडला सोन्याचा 'बेडा' 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 06:17 PM2024-06-10T18:17:46+5:302024-06-10T18:18:46+5:30

कसबा बीड : कोल्हापूरच्या शिलाहार राजवंशाची उपराजधानी आणि लष्करी तळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कसबा बीड (ता. करवीर) येथे सोन्याचा ...

A woman farm laborer found a gold coin at Kasba Beed in Kolhapur | कोल्हापुरातील कसबा बीड येथे शेतमजूर महिलेला सापडला सोन्याचा 'बेडा' 

कोल्हापुरातील कसबा बीड येथे शेतमजूर महिलेला सापडला सोन्याचा 'बेडा' 

कसबा बीड : कोल्हापूरच्या शिलाहार राजवंशाची उपराजधानी आणि लष्करी तळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कसबा बीड (ता. करवीर) येथे सोन्याचा पाऊस पडतो अशी अख्यायिका अनेक शतकांपासून प्रचलित आहे. याचा प्रत्यय बीडच्या महिला आणि ग्रामस्थांना सतत येतोच. गाव भागात, रस्त्यावर, कडेला, शेतात, घरांच्या छतावर,अशा ठिकाणी गावकऱ्यांना या सुवर्णमुद्रा, सुवर्णअलंकार, चांदीची नाणी, वीरगळ, कोरलेल्या मुर्त्या, सापडतात. 

आज, सोमवारी (दि. १०) सकाळी बनाबाई यादव या शेताकडे निघाल्या असताना प्रकाश तिबिले यांच्या घराजवळ रस्त्यालागूनच डाव्या बाजूला त्यांना त्रिशूळ छाप सुवर्णमुद्रा सापडली. आज सोमवार गावचे ग्रामदैवत श्री कल्लेश्वर (महादेव) यांचा दिवस हा योगायोग असल्याने त्रिशूळ छाप सुवर्णमुद्रा सापडल्याने बनाबाई फार आनंदित झाल्या.

स्थानिक भाषेत या सुवर्णमुद्राना  'बेडा' असे संबोधले जाते. बनाबाईंना सापडलेला बेडा ६ मिमीचा असून त्यावरील अंकण सुस्पष्ट व त्रिशूळ छाप, टिंबांचे आकार आढळतात. दुसऱ्या बाजूला उभवटा दिसून येतो. लहान गोल आकाराच्या तुकड्यावरील बारीक अंकण करण्याचे कसब पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. गावात पहिला पाऊस पडल्याबरोबर सापडणारे बेडे प्राचीन कसबा बीड गतवैभवाची जणू साक्ष, आजही देत आहेत.  
        
दैवी प्रसाद म्हणून पुजतात बेडा!  
 
बीडमध्ये असे सापडणारे बेडे ग्रामस्थ घरातील देव्हाऱ्यात दैवी प्रसाद म्हणून हा बेडा पुजतात. कसबा बीडच्या ऐतिहासिक ठेव्याचे जतन व संवर्धन आणि संशोधन येथील 'यंग ब्रिगेड राजधानी' ही संघटना अशा सुवर्णमुद्रांची माहिती व संकलन आणि प्रसारण करत असते. बेडा सापडल्याची पंचक्रोशीत समजताच पहाण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती.                             

Web Title: A woman farm laborer found a gold coin at Kasba Beed in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.