मुलाचा प्लॅट.. माहेरची वाट.. अन् मृत्यूशी गाठ; पुण्याजवळ अपघातात कोल्हापूरची महिला तसेत दाजीपूरच्या माय-लेकांसह तीन ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 01:27 PM2023-04-24T13:27:26+5:302023-04-24T13:27:51+5:30
पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली
कोल्हापूर : शास्त्रीनगर येथील नीशा प्रमोद भास्कर (वय ३६) या त्यांच्या मुलीसह माहेरी पुण्याला निघाल्या होत्या. पुणे समोर दिसत असतानाच पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली. या भीषण अपघाताने नीशा भास्कर यांची माहेरची वाट अर्ध्यावरच संपवली. हा अपघात रविवारी (दि.२३) पहाटे अडीचच्या सुमारास घडला.
या अपघातात त्यांची मुलगी अधिरा प्रमोद भास्कर (वय ६) हिच्यासह स्मिता रामचंद्र जहागीरदार (वय ५२,रा. साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर) आणि जयश्री अशोक देसाई (वय ५३, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) या कोल्हापूरच्या महिला जखमी झाल्या आहेत. अपघातात एकूण चौघे ठार झाले असून, त्यातील तिघे कोल्हापूरचे आहेत, तर एकूण २२ प्रवासी जखमी झाले आहेत.
शास्त्रीनगर येथे म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या नीशा भास्कर यांचे पती फायनान्स कंपनीत काम करतात. मुलीच्या शाळेला सुटी लागल्याने त्या शनिवारी रात्री मुलीला घेऊन माहेरी निघाल्या होत्या. सीबीएस परिसरात त्या पिंक बसच्या नीता ट्रॅव्हल्समध्ये बसल्या, पुण्यापासून अलीकडे नवले पुलाजवळ ट्रॅव्हल्स पोहोचताच पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिली आणि काही समजण्यापूर्वीच भरधाव ट्रॅव्हल्स पलटून रस्त्यावर काही अंतर घसरत गेली. भीषण अपघातात नीशा यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सुदैवाने नीशा यांची मुलगी अधिरा अपघातातून बचावली. तिच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताने नीशा यांची माहेरची वाट अर्ध्यावर संपली, तर नीशा आणि अधिरा या माय-लेकीची ताटातूट केली.
साने गुरुजी वसाहतीमधील स्मिता जहागीरदार या शिक्षिका मुंबईतील नातेवाइकांकडे निघाल्या होत्या. त्याही या अपघातात जखमी झाल्या, तसेच राजेंद्रनगरातील जयश्री देसाई यांच्यावरही पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच नीता ट्रॅव्हल्सने कोल्हापुरातून निघालेल्या प्रवाशांच्या नातेवाइकांची घालमेल वाढली होती.
रात्री उशिरा अंत्यसंस्कार
अपघाताची माहिती मिळताच भास्कर यांच्या नातेवाइकांनी पुण्याकडे धाव घेतली. नीशा यांचे माहेरचे नातेवाईकही रुग्णालयात पोहोचले होते. सायंकाळी त्यांचा मृतदेह कोल्हापुरात पोहोचला. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बनावट नावाची ट्रॅव्हल्स कंपनी
नीता ट्रॅव्हल्स कंपनी ही कोल्हापुरातील नामांकित ट्रॅव्हल्स कंपनी आहे. या नावाने मुंबईतील डोंबिवली येथील चंद्रकांत छेडा या व्यक्तीने ट्रॅव्हल्स कंपनी सुरू केली असून, पिंक बस या नावाने तिचे ऑनलाइन बुकिंग चालते. नीता हे नाव वापरू नये, अशी नोटीसही नीता ट्रॅव्हल्स कंपनीने छेडा यांना पाठवली होती, अशी माहिती नीता ट्रॅव्हल्सचे मालक सिकंदर पठाण यांनी दिली.
आईला फ्लॅट दाखविण्यासाठी मुंबईला घेऊन निघाले, अन् काळाचा घाला
दाजीपूर (ता. राधानगरी) येथील रवींद्र कोरगावकर हे मुंबई येथे पोस्ट खात्यात नोकरीस असून, पत्नी आणि दोन मुलींसह ते मुंबईत राहत होते. नुकताच त्यांनी मुंबईत नवीन फ्लॅट खरेदी केला आहे. आपल्या आईला फ्लॅट दाखविण्यासाठी ते दाजीपूरहून मुंबईला घेऊन निघाले होते. दाजीपूरचे माजी सरपंच वासुदेव कोरगावकर यांच्या त्या पत्नी आणि सुपुत्र आहेत. या दुर्घटनेमुळे दाजीपूर परिसरात शोककळा पसरली आहे.