कोल्हापूरकरांनो सावधान! आता चक्क मोबाईल हॅक करून घातला जातोय गंडा; महिलेच्या खात्यातून चार लाख गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 11:53 AM2022-05-13T11:53:35+5:302022-05-13T11:54:22+5:30
संशयिताने पंडित यांच्या आत्येबहीण साधना सतीश घाटगे यांना पंडित हेच मोबाईलवर मेसेज पाठवत आहेत असे भासवून विश्वास संपादन केला. तसेच मेसेज पाठवून घाटगे यांना चार लाख रुपये बॅंकखात्यात ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले.
कोल्हापूर : एकाचा मोबाईल हॅक करून त्याच्या नातेवाइकाला मेसेज पाठवून सुमारे चार लाख रुपये आपल्या बॅंक खात्यावर ट्रान्स्फर करण्यास भाग पाडून गंडा घातल्याचा प्रकार नुकताच घडला. याबाबत फसवणूक झालेल्या साधना सतीश घाटगे (रा. सुर्वे कॉलनी, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर) यांनी संशयित आरोपी जयदीप कुमार याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जयदीप कुमार या संशयिताने दर्शन पंडित यांचा मोबाईल हॅक केला. संशयिताने पंडित यांच्या आत्येबहीण साधना सतीश घाटगे यांना पंडित हेच मोबाईलवर मेसेज पाठवत आहेत असे भासवून विश्वास संपादन केला. तसेच मेसेज पाठवून घाटगे यांना चार लाख रुपये बॅंकखात्यात ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले.
ही घटना दि. २९ एप्रिल रोजी दिवसभरात घडली. कालांतराने हा मेसेज पंडित याने पाठवला नसल्याचे घाटगे यांच्या लक्षात आले. त्यानुसार ज्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर झाले, त्या जयदीप कुमार याच्याविरोधात त्यांनी गुरुवारी सायंकाळी शाहुपूरी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली.