आधीचे नव्हतेच काही, आता आईदेखील नाही..; अपघाताने सर्वस्वच हिरावून घेतले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 11:49 AM2022-11-29T11:49:18+5:302022-11-29T11:49:48+5:30
अपघाताने एका चार वर्षीय बालकाचे सर्वस्वच हिरावून घेतले
कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर गोकुळ शिरगाव येथे रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा सोमवारी (दि. २८) उपचारादरम्यान सीपीआरमध्ये मृत्यू झाला. अनोळखी आणि बेवारस महिलेचा अपघात गुरुवारी (ता. २४) झाला होता. त्याच अपघातात महिलेचा चार वर्षांचा मुलगा किरकोळ जखमी झाला. अपघातात आईचे छत्र हरवल्यामुळे निष्पाप आणि निरागस बालक पोरके झाले. आधीचे नव्हतेच काही, आता आईदेखील नाही..असे कालवाकालव होणारे आयुष्य त्याच्या वाट्याला आले.
युद्धात किंवा दहशतवादी हल्ल्यात दगावणाऱ्या माणसांपेक्षा अपघातांमध्ये दगावणाऱ्या माणसांची संख्या खूपच जास्त आहे. अपघातांमुळे क्षणात चालता-बोलता माणून निघून जातो, तर कधी आयुष्यभरासाठी जायबंद होतो. त्यातून संपूर्ण कुटुंब कोसळते. पुणे-बंगळुरू महामार्गावर गोकुळ शिरगाव येथे गुरुवारी झालेल्या अपघाताने एका चार वर्षीय बालकाचे सर्वस्वच हिरावून घेतले. अंदाजे ३५ ते ४० वर्ष वयोगटातील भटकंती करणारी आई तिच्या चार वर्षीय बालकासह रस्ता ओलांडत होती. त्याचवेळी भरधाव वाहनाने तिला जोरदार धडक दिली. त्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली. मुलगा किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर परिसरातील काही नागरिकांनी जखमी महिलेला आणि बालकाला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.
कोमात गेलेल्या महिलेवर उपचार सुरू असताना सीपीआरमधील कर्मचाऱ्यांनी व अंनिसच्या कार्यकर्त्या गीता हसूरकर यांनी माणुसकी दाखवत बालकाचा सांभाळ केला, पण आईशिवाय जगात दुसरे काहीच नसलेले बालक अपघाताने सैरभैर झाले. अखेर त्याच्या आईची चार दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि तिने सोमवारी जगाचा निरोप घेतला. या अपघातामुळे निष्पाप बालक पोरके झाले. त्याला आता पोलिसांकडून बालगृहात पाठवले जाणार आहे