ए. वाय. पाटील यांचा उपाध्यक्ष व सदस्यत्वाचा राजीनामा; जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 09:27 PM2024-08-21T21:27:52+5:302024-08-21T21:28:45+5:30
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत घडामोडींमुळे आणि पक्षाच्या नाट्यमय स्थितीमुळे पाटील यांचा हा राजीनामा अधिकच शंकास्पद ठरला आहे. त्यांच्या या निर्णयाने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोळांकूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि केडीसीसी बँकेचे संचालक आनंदराव यशवंतराव तथा ए. वाय. पाटील यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला आहे. सुनील तटकरे यांना पाठवलेल्या आपल्या राजीनाम्यात, पाटील यांनी वैयक्तिक कारणे आणि पदावर वेळ देण्याच्या असमर्थतेचा उल्लेख केला आहे.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत घडामोडींमुळे आणि पक्षाच्या नाट्यमय स्थितीमुळे पाटील यांचा हा राजीनामा अधिकच शंकास्पद ठरला आहे. त्यांच्या या निर्णयाने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पाटील यांच्या अचानक राजीनाम्याने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, यामागील खरे कारण काय असावे याबद्दल तर्कवितर्कांच्या चर्चेला उधाण आले आहे. हा राजीनामा त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळेच आहे की पक्षाच्या अंतर्गत राजकारणातील काही दडपशाहीमुळे? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचे पुढील नेतृत्व कोण करणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ए. वाय. पाटील यांच्या या राजीनाम्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पाटील यांचा राजीनामा पक्षाच्या अंतर्गत परिस्थितीचा परिणाम आहे का, कोल्हापूरसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील या नाट्यमय घडामोडींचे भविष्यातील राजकीय परिणाम काय असू शकतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.