तरुणाचा डिझेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न, कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 02:08 PM2023-01-06T14:08:20+5:302023-01-06T14:08:44+5:30
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला ताब्यात घेतले
कोल्हापूर : इचलकरंजीतील वडिलोपार्जित जमीनवाटपाच्या वादातून गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात तेजपाल महावीर चौगुले (वय ३२ ) या तरुणाने डिझेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर सरकारी कामात अडथळा व आत्महत्येचा प्रयत्न या दोन्ही कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळी सव्वाअकराच्या सुमारास चौगुले कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आले. त्यानंतर तेजपाल याने स्वत:च्या अंगावर डिझेल ओतून घेतले. हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्यांनी बघून पोलिसांना हाक मारली. पोलिस हवालदार खुदबुद्दीन मुजावर व तेजपाल यांच्यात थोडी झटापट झाल्यावर त्यांनी तेजपालला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेले.
चौगुले कुटुंबाची चार गटांमध्ये १ हेक्टर ३ आर, ३६ गुंठे, ३ गुंठे अशी वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीवरून दोन भावांमध्ये वाद आहे. तो तहसीलदारांकडे गेल्यानंतर त्यांनी जमिनीची मोजणी करून भावांमध्ये तिचे समान वाटप केले. याच दरम्यान उच्च न्यायालयातदेखील तेजपाल चौगुले कुटुंबाच्या बाजूने निकाल लागला.
मात्र दुसऱ्या भावाने तहसीलदारांच्या विरोधात इचलकरंजी प्रांतांकडे याचिका दाखल केली. त्यानंतर प्रांतांनी भूमी अभिलेख विभागाला जमिनीच्या पुनर्मोजणीचे आदेश दिले. त्या आशयाची नोटीस भूमी अभिलेखने चौगुले कुटुंबाला काढली. एकदा जमीन वाटप झाल्यानंतर पुनर्मोजणी का? या मुद्द्यावरून चौगुले कुटुंबाने आत्मदहनाचा इशारा दिला होता.
या घटनेनंतर कुटुंबीयांनी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी शिंदे यांनी विरोधात निकाल लागलेल्या व्यक्तीला दाद मागण्याचा अधिकार आहे. हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. आत्मदहनाचा इशारा देण्याऐवजी न्यायालयीन पातळीवर प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगितले.