पत्नीला फोन करुन मुलांचा चांगला सांभाळ कर म्हणाला, अन् पतीने...; कोल्हापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 12:45 PM2023-01-23T12:45:56+5:302023-01-23T12:46:21+5:30
त्यानंतर मोबाइल स्विच ऑफ
पोर्ले तर्फ ठाणे (जि. कोल्हापूर) : कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील वाघबिळ घाटात पाझर तलावाजवळ तरुणाने झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. २२) सकाळी उघडकीस आली. समीर अल्लाउद्दीन झांजी (वय ३५, रा. आपटी, ता. पन्हाळा), असे मृत तरुणाचे नाव आहे. पहाटेदरम्यान समीरने आत्महत्या केली असल्याचा अंदाज करवीर पोलिसांनी वर्तविला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी समीरने त्याच्या पत्नीला फोन केला होता.
रविवारी सकाळी वाघबिळच्या दरीतील एका झाडास लटकलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मृतदेहाच्या खिशातील आधार कार्डवरून त्याची ओळख पटवण्यात आली.
समीर झांजी जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार करत होता. शनिवारी (दि. २१) रात्री उशिराने तो घरातून बाहेर पडला होता. त्याचे पत्नीबरोबर रात्री एकच्या सुमारास मोबाइलवरून संभाषण झाले होते. त्यावेळी त्याने पत्नीस मुलांचा चांगला सांभाळ कर, असे सांगितले.
त्यानंतर त्याचा मोबाइल स्विच ऑफ होता. रविवारी सकाळी कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील वाघबिळ घाटाच्या दरीत त्याचा मृतदेह झाडाला लटकताना दिसून आला. आत्महत्येचे करण अद्याप समजू शकले नाही. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, दोन भाऊ असा परिवार आहे.