लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून तरुणाने संपवले जीवन, कोल्हापुरातील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 01:35 PM2023-06-02T13:35:18+5:302023-06-02T13:35:33+5:30
शेती आणि जनावरांच्या दूध व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने तो शेतीत रमला, पण लग्न ठरत नसल्याने टोकाचा निर्णय घेतला
कोल्हापूर : वयाची ३२ वर्षे उलटून गेली तरी लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी (दि. १) सायंकाळी सहाच्या सुमारास शिंगणापूर (ता. करवीर) येथे जनावरांच्या गोठ्यात घडला. चेतन भिवाजी चौगले (वय ३३, रा. शिंगणापूर) असे मृताचे नाव आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले होते. त्यानंतर तो शेतीत वडिलांना मदत करू लागला. शेती आणि जनावरांच्या दूध व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने तो शेतीत रमला. गेल्या चार-पाच वर्षांपासून त्याचे लग्न ठरवण्याचे प्रयत्न नातेवाइकांकडून सुरू होते. मात्र, लग्न जुळत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात होता.
यातूनच गुरुवारी सायंकाळी चौगुले मळा येथील जनावरांच्या शेडमध्ये लाकडी वाशाला दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात येताच त्याला नातेवाइकांनी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्याच्या पश्चात आई, वडील आणि दोन विवाहित भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.