कोल्हापूर जिल्हा न्यायालयाच्या दारातच बेंगळुरूच्या तरुणाचा मृत्यू, सुनावणीसाठी निघाला होता न्यायालयात
By उद्धव गोडसे | Published: January 29, 2024 03:37 PM2024-01-29T15:37:38+5:302024-01-29T15:37:58+5:30
कौंटुंबिक वादाचा खटला गेल्या तीन वर्षांपासून सुरू
कोल्हापूर : कसबा बावडा येथील जिल्हा न्यायालयात खटल्याच्या सुनावणीसाठी जाताना विवेक अशोक चलाणी (वय ३६, रा. बी.एम. रोड, बेंगळुरू) हा तरुण चक्कर येऊन पाय-यांवरच कोसळला. पोलिसांनी त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. ही घटना आज, सोमवारी (दि. २९) दुपारी बाराच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बेंगळुरू येथील विवेक चलाणी याचा कौंटुंबिक वादाचा खटला जिल्हा न्यायालयातील प्रथमवर्ग न्याय दंडाधिका-यांसमोर गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. नेहमीप्रमाणे तो सोमवारी सुनावणीसाठी न्यायालयाच्या आवारात पोहोचला. पाय-या चढताना चक्कर येऊन तो कोसळला. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी ११२ नंबरवर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली.
चलाणी यांचे वकील उदयसिंग पाटील हे काही सहका-यांसह पोहोचले. काही वेळातच शाहूपुरी पोलिस न्यायालयाच्या आवारात पोहोचले. त्यांनी तातडीने चलाणी याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने चलाणी याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.