तेरा टक्के नफा देतो म्हणाला अन् ३ कोटी रुपये हडपून बेपत्ता झाला; कोल्हापुरातील तरुणाचा २५ जणांना गंडा
By उद्धव गोडसे | Published: September 12, 2023 01:06 PM2023-09-12T13:06:22+5:302023-09-12T13:06:40+5:30
ना ऑफिस, ना फर्म
उद्धव गोडसे
कोल्हापूर : शेअर मार्केटमधून दरमहा सहा ते १३ टक्के परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून उत्तरेश्वर पेठेतील तरुणाने सुमारे तीन कोटी रुपयांना गंडा घातल्याची तक्रार गुंतवणूकदारांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली. अमोल नंदकुमार परांजपे (रा. उमरावकर गल्ली, उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे. गुंतवलेली रक्कम परत मागण्याचा तगादा गुंतवणूकदारांकडून सुरू होताच संशयित परांजपे बेपत्ता झाला आहे.
गुंतवणूकदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित अमोल परांजपे याने उत्तरेश्वर पेठ, शिवाजी पेठ परिसरातील नागरिकांचा विश्वास संपादन करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. ट्रेडिंगसाठी रक्कम दिल्यास त्यावर सहा ते १३ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. जानेवारी २०२१ पासून त्याने गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला चांगला परतावा देऊन, पुन्हा त्याच लोकांना जादा गुंतवणूक करण्यास त्याने सांगितले. यातून अनेकांनी त्याच्याकडे रोख रक्कम आणि धनादेशाद्वारे कोट्यवधी रुपये जमा केले.
एप्रिल २०२३ पासून त्याने परतावे देणे थांबवले. त्यानंतर गुंतवणूकदारांनी मूळ रक्कम परत मिळवण्यासाठी त्याच्याकडे तगादा लावला; मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन लोकांचे पैसे देणे टाळले. संशयित परांजपे बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने गेल्याच आठवड्यात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. २५ गुंतवणूकदारांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून, परांजपे याने आणखी चार साथीदारांच्या मदतीने तीन कोटी २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा उल्लेख त्यांनी तक्रार अर्जात केला आहे.
ना ऑफिस, ना फर्म
परांजपे यांचे शहरात कुठेही कार्यालय नाही. ट्रेडिंग करण्यासाठी त्याची कुठली फर्मही नाही. मोबाइलचे रिचार्ज विक्रीतून त्याने लोकांचा विश्वास संपादन केला. गुंतवणूकदारांच्या घरात जाऊन तो पैसे गोळा करीत होता, अशी माहिती गुंतवणूकदारांनी दिली.
गुंतवले सात लाख, मिळाले दोन लाख
एका गुंतवणूकदाराने परांजपे याच्याकडे सुरुवातीला एक लाख रुपये गुंतवले होते.
वार्षिक ९६ टक्के परतावा मिळण्याच्या आमिषाने त्याने पुन्हा सहा लाख रुपये दिले. सप्टेंबर २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीत त्याने सात लाख रुपये गुंतवले. त्याला दोन लाख रुपयांचा परतावा मिळाला. आता परतावे बंद होऊन मुद्दल अडकल्याने त्याने पोलिसांकडे धाव घेतली.