Kolhapur News: धरणातून पाणी सोडल्याने वेदगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ, अंथरुण धुवायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 04:37 PM2023-03-07T16:37:58+5:302023-03-07T16:38:22+5:30

कुटुंबियांच्या डोळ्यांदेखतच घडली दुर्घटना

A young man from Songe in Kagal taluk died after drowning in Vedganga river | Kolhapur News: धरणातून पाणी सोडल्याने वेदगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ, अंथरुण धुवायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

Kolhapur News: धरणातून पाणी सोडल्याने वेदगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ, अंथरुण धुवायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

googlenewsNext

दत्तात्रय पाटील

म्हाकवे : धरणातून पाणी सोडल्याने वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीला अंथरुण धुवायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. सोनगे (ता. कागल) येथील संजय आनंदा तोरसे (वय ४५) असे या मृत तरुणाचे नाव आहे. तोरसे हे मुळचे खडकेवाडा येथील असून सध्या सोनगे येथे राहत होते. या दुर्दैवी घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली आहे. ऐन यात्रेच्या तोंडावरच संजयची एक्झिट ग्रामस्थांना चटका लावणारी ठरली. ही घटना आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, सोनगे येथील यात्रा (म्हाई) दि.१५ रोजी आहे. त्यामुळे तोरसे आपल्या कुटुंबियासह बस्तवडे येथील बंधाऱ्याखाली अंथरूण धुण्यासाठी गेले होते. दरम्यान, धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. तोरसे यांना पोहता येत होते. मात्र, पाण्याचा अधिक प्रवाह आणि भोवरा निर्माण झाल्याने त्यांना बाहेर येता आले नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने ते पात्रामध्ये खोलवर गेले. त्यांच्या मुलांनी आरडाओरड केला. परंतू त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ते हमिदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्यात कर्मचारी होते. तोरसे हे मनमिळावू स्वभावाचे होते. त्याच्या दुर्दैवी मृत्यूबाबत ग्रामस्थातून हळहळ व्यक्त होत आहे‌. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, दोन मुले असा परिवार आहे.

कुटुंबीयांच्या डोळ्यांदेखत मृत्यू

प्रचंड कष्ट आणि परिश्रमाच्या जोरावर संजयने या कुटुंबाला दारिद्रयातून सावरले होते. तो नोकरी सांभाळून शेती, जनावरेही सांभाळत होता. आता कुठे आर्थिक घडी बसली होती. अन् काळाने संजयला हिरावून घेतले. त्यांना वाचविण्यासाठी काही तरुणांनी प्रयत्न केले. मात्र, पाण्याच्या प्रवाहामुळे त्याच्या पर्यंत पोहचणे अशक्य झाले. 

Web Title: A young man from Songe in Kagal taluk died after drowning in Vedganga river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.