धक्कादायक! हळदीच्या कार्यक्रमात विजेचा धक्का लागून तरुण ठार
By उद्धव गोडसे | Published: May 25, 2023 09:21 AM2023-05-25T09:21:35+5:302023-05-25T09:23:41+5:30
निगवे दुमालातील दुर्घटना, मृत जोतिबा कांबळे कोल्हापुरातील.
कोल्हापूर: निगवे दुमाला (ता. करवीर) येथे सासरवाडीतील नातेवाईकाच्या लग्नाच्या हळद कार्यक्रमात पाण्याच्या शॉवरमध्ये विजेचा प्रवाह उतरून जावयाचा जागेवरच मृत्यू झाला. तर अन्य दोघे जखमी झाले. जोतिबा विठ्ठल कांबळे (वय ३७, सध्या रा. कानाननगर, मूळ रां. कोवाड , ता. चंदगड) असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि. २४) रात्री नऊच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती आशी की, जोतिबा कांबळे हा कोल्हापुरातील बी न्यूज च्या कार्यालयात ऑफिस बॉय पदावर काम करीत होता. निगवे येथे सासरवाडीत नातेवाईकांचे लग्न असल्याने तो पत्नी, दोन मुली आणि चार महिन्यांच्या मुलासह निगवे येथे गेला होता. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास हळदीच्या कार्यक्रमासाठी दारात शॉवरची व्यवस्था केली होती. त्यावेळी शॉवरमध्ये लावलेल्या बल्बमध्ये विजेचा प्रवाह उतरला. शॉवरसाठी लावलेल्या लोखंडी पाईपला धरून थांबलेल्या जोतीबाला विजेचा जोरदार धक्का बसला. इतर दोघे किरकोळ जखमी झाले. जोतिबाचा जागीच मृत्यू झाला. नातेवाईकांनी तातडीने त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, चार महिन्यांचा मुलगा, आई, वडील असा परिवार आहे.
वयाच्या पंधराव्या वर्षी तो नोकरीच्या शोधात कोवाडमधून कोल्हापुरात आला होता. गेली २० वर्ष तो बी न्यूजचा कार्यालयात काम करीत होता. कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर प्रामाणिक धडपड करणाऱ्या जोतिबाच्या अनपेक्षित जाण्याने सर्वानाच धक्का बसला.