कोल्हापुरात वादळी वाऱ्याने घेतला तरुणाचा बळी, वीज तारेला चिकटल्याने तडफडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 11:44 AM2023-05-13T11:44:54+5:302023-05-13T11:45:18+5:30
झाडाच्या आडोशाला जात असतानाच रस्त्याकडेला पडलेली डीपीला जोडलेली उच्च प्रवाहित तार त्याच्या गळ्याला चिकटली
कोल्हापूर : अवकाळी पावसासह वादळवाऱ्यामुळे रस्त्याकडेला झाडाजवळ पडलेली उच्च प्रवाहित तार मानेजवळ चिकटून तरुणाचा जागीच तडफडून मृत्यू झाला. अप्पाजी नामदेव पोवार (वय १९, रा. शांतीनगर, उचगाव, ता.करवीर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री कात्यायानीजवळ घडली. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अप्पाजी पोवार व त्याचे सहकारी विनायक चव्हाण, अमर चव्हाण हे कॅटरर्सकडे कामाला आहेत. मागणीप्रमाणे विविध मंगल कार्यालय, लाॅन, खासगी शेती फाॅर्म येथे रोजच्या मानधनावर काम करतात. गुरुवारी (दि.११) सायंकाळी ते इतर सहकाऱ्यांसमेवत कात्यायानीजवळील एका फाॅर्म हाउसवर कामासाठी गेले होते. तेथून रात्री उशिरा काम आटोपून साडेबारा वाजण्याच्या सुमारास अप्पाजी पोवारसह दोघे सहकारी दुचाकीवरून घराकडे निघाले.
यादरम्यान अप्पाजीने लघुशंकेसाठी मोटारसायकल थांबविण्यास सांगितली. अंधार, पाऊस पडल्याने येथे थांबायला नको असे मित्रांनी त्याला सल्ला दिला. मात्र, त्याने मोटारसायकल थांबावा असे सांगितले. त्यामुळे ती थांबविली व त्याने झाडाच्या आडोशाला जात असतानाच रस्त्याकडेला पडलेली डीपीला जोडलेली उच्च प्रवाहित तार त्याच्या गळ्याला चिकटली. त्यामुळे त्याचा क्षणार्धात तडफडून मृत्यू झाला.
बराच वेळ झाला तो न आल्याने मित्रांनी हाका मारल्या पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. मोबाइलच्या बॅटरीत शोध घेतला असता अप्पाजी जमिनीवर पडला होता. विनायक चव्हाणने पोलिस, अग्निशमन दलासह इतर मित्र आणि वीज वितरण कंपनीचे कर्मचाऱ्यांशी मदतीसाठी संर्पक साधला. घटनास्थळी वीज वितरण कर्मचारी दाखल होऊन विद्युत पुरवठा खंडित केला. त्यानंतर इतरांनी तरुणाला सीपीआर रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.