Kolhapur: चरीतील पाण्यात बुडून मिरजेतील तरुणीचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 12:35 PM2024-12-04T12:35:37+5:302024-12-04T12:35:58+5:30
कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील कोपेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन परतत असताना महाविद्यालयीन तरुणीचा मोपेडवरील ताबा सुटून रस्त्याच्या कडेला ...
कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील कोपेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन परतत असताना महाविद्यालयीन तरुणीचा मोपेडवरील ताबा सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या चरीतील पाण्यात बुडाल्याने जागीच मृत्यू झाला तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे.
इव्हेजनील बाळासाहेब जिरगे (वय २०, रा. लातूर) असे मृत तरुणीचे नाव आहे तर कविता श्रीशैल माळी (वय २४, रा. माडग्याळ, ता. जत, जि. सांगली) गंभीर जखमी असून, तिच्यावर सांगली शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास खिद्रापूर - टाकळी मार्गावरील प्रकाश रायनाडे यांच्या शेताजवळ ही दुर्घटना घडली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. येथील पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.
जिरगे, माळी व अन्य दोन मैत्रिणी मिरज येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असून, मंगळवारी चौघी दोन मोपेड घेऊन खिद्रापूर कोपेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. जिरगे ही मोपेड चालवत होती. दर्शन घेऊन परतत असताना खिद्रापूर टाकळी मार्गावरील रायनाडे यांच्या शेताजवळ येताच मोपेडवरील ताबा सुटून ती थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या चरीत गेली.
पाठीमागील सीटवर बसलेली कविता रस्त्यावर पडून बेशुद्ध पडली होती तर इव्हेजनील ही चरीतील पाण्यात बुडाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मुलगी चरीत पडल्याचे समजताच काही प्रवाशांनी तिला बाहेर काढले, मात्र तिचा मृत्यू झाला होता. कुरुंदवाड पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अधिक तपास कुरुंदवाड पोलिस करीत आहेत.
अन् अपघाताची माहिती मिळाली
खिद्रापुरातून बाहेर पडताना रस्ता चुकल्याने जिरगे एका मार्गाने तर दुसरी मैत्रीण दुसऱ्या मार्गाने गेली. चुकामूक झाल्याने एका मैत्रिणीने फोन केला असता अपघातस्थळी नागरिकांनी फोन उचलून अपघाताची माहिती अन्य दोन मैत्रिणींना समजली. त्यामुळे नागरिकांनाही अपघातातील मुलींची माहिती समजण्यास मदत झाली.