Kolhapur: अज्ञात वाहनाची धडक, २५ फूट नेले फरफटत; दुचाकीस्वार तरुणी ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 03:44 PM2024-08-29T15:44:49+5:302024-08-29T15:51:31+5:30

पाटील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर

A young woman was killed in a collision with an unknown vehicle near Gokul Shirgaon kolhapur | Kolhapur: अज्ञात वाहनाची धडक, २५ फूट नेले फरफटत; दुचाकीस्वार तरुणी ठार

Kolhapur: अज्ञात वाहनाची धडक, २५ फूट नेले फरफटत; दुचाकीस्वार तरुणी ठार

कोल्हापूर : गोकुळ शिरगाव रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने धडक देऊन २५ फूट फरफटत नेल्याने अपघातात कॉलेज तरुणी ठार झाली. शिवानी संतोष पाटील (वय १९, रा. अंबाई टँक), नवनाथ हाऊसिंग सोसायटी, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. बुधवारी सकाळी हा अपघात झाला. घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिसांत झाली. तरण्याताठ्या मुलीच्या अशा अपघाती निधनाने पाटील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला.

पोलिसांनी सांगितले की, केआयटी येेथे पुढील शैक्षणिक प्रवेशाच्या चौकशीसाठी शिवानी सकाळी मोपेडवरून गेली होती. कॉलेज प्रवेश निश्चित करून जीवनाची सुरुवात करण्याची उत्कंठा तिला लागून राहिली होती; परंतु क्रूर नियतीला हे बघवले नाही. कॉलेजमधील काम संपल्यानंतर ती घरी जात होती. गोकुळ शिरगावजवळील सुदर्शन पेट्रोल पंपाजवळ आली असता तिला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात शिवानी मोपेडसह २५ फूट फरफटत गेली.

यामध्ये तीच्या डोक्याला मार लागला. अपघाताची माहिती तिच्या मित्रपरिवाराला समजली. त्यांनी आणि परिसरातील नागरिकांनी तिला उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. वसंतराव चौगुले पतसंस्थेचे अध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक अनिल पाटील यांची ती नात होती. एस. व्ही. एंटरप्राइजेसचे मालक संतोष अरविंद पाटील यांची ती कन्या होती. रक्षाविसर्जन आज सकाळी आठ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत आहे.

Web Title: A young woman was killed in a collision with an unknown vehicle near Gokul Shirgaon kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.