Kolhapur: खड्ड्याने घेतला बळी; खुपिरे-साबळेवाडीजवळ अपघातात तरुण जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 03:17 PM2024-08-17T15:17:45+5:302024-08-17T15:18:07+5:30
कोपार्डे : खुपिरे-साबळेवाडी (ता.करवीर) येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या खड्ड्यात मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने दुचाकीस्वार घसरून टँकरच्या चाकाखाली आला. दुधाच्या टँकरचे ...
कोपार्डे : खुपिरे-साबळेवाडी (ता.करवीर) येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या खड्ड्यात मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने दुचाकीस्वार घसरून टँकरच्या चाकाखाली आला. दुधाच्या टँकरचे मागील चाक अंगावरून गेल्याने हा तरुण जागीच ठार झाला. कृष्णात खेमराज बेगडा (वय ३०) मूळ गाव रत्नागिरी (सध्या रा.बालिंगा) असे त्याचे नाव आहे. सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली. घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अपघातात ठार झालेला युवक कृष्णात बेगडा मूळचा रत्नागिरीतील आहे. काही दिवस तो कुटुंबासह खुपिरे येथे राहत होता. सध्या बालिंगा येथे तो राहत होता. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर साबळेवाडी फाट्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होता. कृष्णात शुक्रवारी सकाळी खुपिरे येथील ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी असलेल्या आपल्या मावस भावाला भेटून दोनवडे गावाकडे निघाला होता. साबळेवाडी गावाजवळ तो आला असता अरुंद रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात त्याची मोटरसायकल गेली. यामुळे त्याचा मोटारसायकल वरील ताबा सुटून घसरली.
याचवेळी कोल्हापूरकडून खुपिरे येथे गोकुळसाठी दूध वाहतूक करणाऱ्या टँकरने एम.एच. ०९ जीजे ४१४९ जाणाऱ्या दुधाच्या टँकर खाली तो आला. त्याच्या डाव्या बाजूच्या अंगावरून टँकरचे मागील चाक गेल्याने कृष्णात गंभीर जखमी झाला. डोक्यातून अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. खुपिरेचे पोलिस पाटील सविता गुरव व साबळेवाडी सरपंच ज्योती आंबी यांनी करवीर पोलिसात अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला. यानंतर, मावस भाऊ नितीन वाघेल यांच्या ताब्यात देण्यात आला असून, पुढील तपास करवीर पोलिस करत आहेत.