Kolhapur: 'बीएससी' परीक्षेत कमी गुण पडल्याने युवकाने जीवन संपविले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 11:48 AM2024-06-03T11:48:19+5:302024-06-03T11:48:27+5:30
कुटुंबीयांनी त्याची समजूत काढली. मात्र, तो नैराश्यातून बाहेर आला नाही.
कोल्हापूर : बीएससीच्या दुसऱ्या वर्षाच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून पृथ्वीराज शहाजी पाटील (वय २०, रा. शिरोली दुमाला, ता. करवीर) याने राहत्या घरात छताच्या पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी (दि. २) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला.
शिरोली दुमाला येथील पृथ्वीराज पाटील हा शिवाजी पेठेतील एका महाविद्यालयात बीएससीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. सेमिस्टर परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तो गेल्या आठवड्यापासून नैराश्यात होता. कुटुंबीयांनी त्याची समजूत काढली. मात्र, तो नैराश्यातून बाहेर आला नाही. रविवारी सकाळी घरात त्याने छताच्या पंख्याला दोरीने गळफास घेतला.
हा प्रकार लक्षात येताच नातेवाइकांनी गळफास सोडवून त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्याला दहावीत ८८ टक्के गुण मिळाले होते, तर बारावीला ६० टक्के गुण मिळाले होते. त्याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, चुलते, आजी, आजोबा असा परिवार आहे.