कोल्हापूरमधील राजेंद्रनगर येथील तरुणाचा गँगवॉरमधून पाठलाग करून खून
By संदीप आडनाईक | Published: November 14, 2022 05:24 AM2022-11-14T05:24:05+5:302022-11-14T05:24:30+5:30
Crime News:
- संदीप आडनाईक/ उध्दव गोडसे
कोल्हापूर : गँगवॉरमधून राजेंद्रनगर येथील कुमार शाहूराज गायकवाड (वय २२) या तरुणाचा तीन ते चार हल्लेखोरांनी पाठलाग करून धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून केला. हा प्रकार रविवारी रात्री अकरा वाजन्याच्या सुमारास शहरातील डी वाय पी मॉल ते टाकाळा खण परिसरात घडला. खुनाच्या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले तर मृतांच्या नातेवाईकांसह राजेन्द् नगरातील शेकडो तरुणांनी सीपीआर च्या अपघात विभागासमोर गर्दी केल्याने तणाव वाढला होता.
घटनास्थळ आणि सीपीआर रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार कुमार गायकवाड हा राजेन्द् नगरातील त्याचा मामा त्र्यंबक गवळी याच्याकडे रहात होता. काही महिन्यांपूर्वी कुमार याचा राजेन्द् नगर परिसरातील एका टोळीतील तरुणांशी वाद झाला होता. त्यातून कुमार याच्यावर राजारामपुरी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याच वादातून विरोधी टोळीतील तरुणांची कुमारवर पाळत होती. रविवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास कुमार डीवायपी मॉलजवळ थांबला होता. काही वेळात तीन ते चार तरुण कुमारजवळ पोहोचले. कुमार आणि त्या तरुणांमध्ये वाद सुरू होताच कुमारने पळ काढण्याचा प्रयत्न केला. उड्डाणपुलाकडून तो टाकाळा खणीच्या दिशेने पळत सुटला, त्याचवेळी तीन ते चार हल्लेखोरांनी कोयता आणि एडक्याने त्याच्यावर पाठलाग करून हल्ला चढवला. जमिनीवर कोसळलेल्या कुमारच्या डोक्यात दगड घातला. तसेच डोक्यावर, चेहऱ्यावर, हातावर आणि छातीवर १८ ते २० वार केले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.
काही वेळातच कुमार याचे मामा त्र्यंबक यांनी कुमारच्या मोबाईलवर फोन केला. मात्र कुमारने फोन उचलला नसल्याने त्याच्या शोधासाठी ते उड्डाण पूल परिसरात पोहोचले. त्यावेळी त्यांना भाचा कुमार रस्त्याकडेला गंभीर अवस्थेत पडलेला आढळला. त्यांनी तातडीने कुमारला रिक्षातून सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. राजाराम पुरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
आक्रोश आणि तणाव
कुमारच्या खुनाची माहिती समजताच राजेन्द् नगरातील शेकडो तरुणांनी आणि महिलांनी सीपीआर रुग्णालयाच्या अपघात विभागासमोर गर्दी केली. यावेळी खुनाची माहिती समजताच नातेवाईक आणि महिलांनी आक्रोश केला. तरुणांच्या वाढत्या गर्दीमुळे येथे तणावाचे वातावरण होते. दरम्यान लक्ष्मीपुरी पोलिसानी या परिसरात बंदोबस्त वाढवला.
पोलिस पथक तपासासाठी रवाना
खुनाच्या घटनेनंतर राजेन्द्रनगरात तणाव निर्माण झाला असून राजारामपुरी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे तर पसार झालेल्या हल्लेखोरांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याची पथके रवाना झाली असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
घटनास्थळावर विदारक दृश्य
हल्लेखोरानी पूर्व नियोजित कट करून कुमारचा काटा काढला. टाकाळा खण परिसरातील घटना स्थळा पासून काही अंतरावर कुमारची बुलेट पडली होती. तर एडक्याचा वर्मी घाव डोक्यात बसल्याने त्याचा मेंदू बाहेर आला होता. चेहऱ्यावर धारदार शस्त्रांचे वार झाल्यामुळे आणि दगडाने ठेचल्याने त्याचा चेहरा छिन्नविछिन्न झाला होता.
कुमारचे राजेन्द्रनगरात वलय
कुमारने कमी वयातच राजेन्द्रनगर परीसरात आपले वलय निर्माण केले होते. मामाचे काही व्यवसाय सांभाळत त्याने तरुणांचा एक गट तयार केला होता. त्याच्या भाईगिरीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात सतत झळकत होते.