Kolhapur: गिरोली घाटात तरुणाचे कारमधून केले अपहरण, दुसऱ्याला दरीत ढकलले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 11:43 AM2024-02-01T11:43:01+5:302024-02-01T11:43:25+5:30
कोडोली : गिरोली घाटातून मोटारसायकलवरून जात असलेल्या अक्षय अनिल कांबळे (वय २८, रा. सादळे मादळे, ता. हातकणंगले) या तरुणास ...
कोडोली : गिरोली घाटातून मोटारसायकलवरून जात असलेल्या अक्षय अनिल कांबळे (वय २८, रा. सादळे मादळे, ता. हातकणंगले) या तरुणास चारचाकी गाडीत जबरदस्तीने घालून अपहरण केले आणि त्याच्या मावस भावास दरीत ढकलून दिले. ही घटना बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास गिरोली घाटातील पोहाळे मार्गावरील पांडव लेणीजवळ घडली. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
घटनास्थळ व कोडोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अक्षय कांबळे व त्याचा मावस भाऊ शुभम संतोष मोरे हे दोघे जण मोटारसायकलवरून कोल्हापूर येथील सोनतळी (ता करवीर) येथे पाहुण्यांकडे जात होते. यावेळी दोघे गिरोली घाटातील पांडव लेणीजवळील वळणावर येताच तेथे थांबलेली चारचाकी गाडी मोटारसायकलच्या आडवी लावून मोटारसायकलवरील शुभम मोरे याला तिघांनी धक्काबुक्की करून रस्त्यावरून घाटात सुमारे २० फूट खोल असलेल्या दरीत ढकलून दिले. अन्य दोघांनी अक्षयला जबरदस्तीने चारचाकी गाडीमध्ये घालून जोतिबाच्या दिशेने पलायन केले. शुभम मोरे याने या घटनेची माहिती पोलिसांना देताच कोडोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व घडलेल्या घटनेची माहिती घेतली.
अक्षयचा शोध घेण्यासाठी घाटातील परिसर पोलिसांनी पिंजून काढला असता त्याचा शोध लागला नाही. अपहरणकर्त्याचा पाठलाग करू नये म्हणून मोटारसायकलची चावी अपहरणकर्ते घेऊन गेले तसेच अक्षयचा सुगाव लागू नये म्हणून त्यांच्या जवळ असलेला मोबाइल फोन घटनास्थळी टाकून देण्यात आला होता. तसेच, चारचाकी गाडीचा नंबर दिसू नये म्हणून नंबर प्लेटला चिकट टेप लावण्यात आला होता. त्यामुळे हे अपहरण पूर्वनियोजत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अक्षय हा चार वर्षांपासून गोव्यात खासगी व्यवसाय करीत होता. चार दिवसांपूर्वीच तो सादळे मादळे गावी आला होता. या घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी आप्पासो पवार यांनी कोडोली पोलिस ठाण्यात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पुढील तपास सपोनि कैलास कोडक करीत आहेत