Kolhapur: शाळेत स्नेहसंमेलनावेळी झाला वाद, युवकाचा धारदार शस्त्राने खून; एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 16:07 IST2024-12-27T16:07:29+5:302024-12-27T16:07:58+5:30
पाचजण ताब्यात; तिघे अल्पवयीन

Kolhapur: शाळेत स्नेहसंमेलनावेळी झाला वाद, युवकाचा धारदार शस्त्राने खून; एक गंभीर जखमी
इचलकरंजी : स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेल्यानंतर झालेल्या वादावादीतून युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. प्रसाद संजय डिंगने (वय १७) असे त्याचे नाव आहे. या घटनेत सौरभ शहाजी पाटील (वय २२, दोघे रा. जवाहरनगर, गणपती कट्ट्याजवळ) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला सांगलीतील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना रात्री साडेनऊच्या दरम्यान कबनूर हायस्कूल परिसरात घडली. घटनेमुळे जवाहर नगर आणि कबनूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये तीन अल्पवयीन आहेत.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, प्रसाद हा अकरावीमध्ये शिक्षण घेत आहे. तो आपल्या मित्रांसोबत कबनूर हायस्कूल येथे स्नेहसंमेलन पाहण्यासाठी गेला होता. त्यादरम्यान काही तरुणांसोबत प्रसादचा वाद झाला. डोंब्या, गोंड्या, शिवराज आदी टोपण नावाने परिचित असलेल्या तीन ते पाच तरुणांनी चाकूने प्रसाद याच्यावर वार केले. यात त्याच्या बरगडीत चाकूचा वर्मी घाव बसला तसेच हातावर व छातीवर वार बसल्याने तो जागीच ठार झाला. त्याच्या बचावासाठी गेलेला सौरभ याच्या हातावर, कमरेवर, पाठीवर चाकूने वार करण्यात आले.
दोघांना युवकांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र एक जागीच ठार झाला होता. शाळेच्या आत दोन पोलिस होते. मात्र ही घटना शाळेच्या बाहेर घडल्याने त्यांनाही लवकर समजले नाही. याची माहिती समजल्यानंतर शाळेतील स्नेहसंमेलन तातडीने थांबविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गर्दीवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
इंदिरा गांधी रुग्णालयात मयत आणि जखमींच्या नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत माहिती घेण्याचे काम सुरू होते. खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिस उप अधीक्षक समीरसिंह साळवे, पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.