ज्येष्ठांच्या सवलतीसाठी ‘आधार’ कार्ड
By admin | Published: February 5, 2015 11:22 PM2015-02-05T23:22:16+5:302015-02-06T00:38:10+5:30
दिवाकर रावते : बोगस लाभार्थींना चाप बसेल; एस.टी.मधून होणार शेतीमाल वाहतूक
कोल्हापूर : ज्येष्ठ नागरिकांना एस.टी.बसमध्ये पासऐवजी फक्त आधार कार्ड दाखवून प्रवास करता येईल, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या बदललेल्या नियमामुळे पास काढण्याचा त्रास कमी होईल, शिवाय बोगस ज्येष्ठ नागरिकांनाही चाप बसेल, असा विश्वास रावते यांनी व्यक्त केला. पुढीळ काळात एस.टी.बसमध्ये पाठीमागील सीट ही १० ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, एस. टी. महामंडळाला प्रत्येक वर्षी दोन हजार कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी विविध पातळीवर बैठका घेऊन प्रयत्न सुरू केला आहे. बसस्थानकांच्या २०० मीटरच्या परिसरात एस.टी.चे प्रवासी नेणाऱ्या खासगी गाड्यांच्या मालकांवर आर.टी.ओ., एस. टी. महामंडळाचे अधिकारी आणि पोलीस यांच्या मदतीने कारवाई करण्यासाठी कडक पावले उचलली जाणार आहेत. प्रत्येक वर्षी एस.टी.ला तीन हजार ६०० कोटी डिझेल लागते. हा खर्च काही प्रमाणात भरून काढण्यासाठी एस.टी.बसमधून शेतीमाल वाहतुकीला परवानगी देण्याचा विचार सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. एस.टी.तील ६० टक्के कर्मचारी हे मूळव्याधीने ग्रस्त आहेत. यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर दर सहा महिन्यांनी एस.टी.तील कर्मचाऱ्यांची आरोग्याची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला महिन्यातून पाचवेळा ओव्हर टाईम करणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे त्याला थोडी आर्थिक मदत होईल. शिवाय सर्वांच्या कामावरील ताण कमी होईल. स्थानकांमध्ये बदल करून, शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रत्येक बसस्थानकावर हिरकणी कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.
धोरणात्मक बाबीत अडचणी
एस. टी. महामंडळाचे संचालक बरखास्त करण्यासाठी एक महिन्यापूर्वी नोटीस पाठवावी लागते. त्याप्रमाणे आम्ही संबंधितांना नोटिसाही पाठविल्या. मात्र, त्यांनी न्यायालयाद्वारे त्यावर स्थगिती आणली आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर धोरणात्मक निर्णय घेण्यामध्ये अडचणी येत असल्याची रावते यांनी यावेळी कबुली दिली. तसेच कोल्हापुरातील महानगरपालिका निवडणुकीतील युतीबाबत विचारले असता जिल्ह्याचे संपर्कप्रमुख दुधवाडकर, स्थानिक आमदार व पदाधिकारी युतीबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.