आजरा पाणीपुरवठा योजना ‘पांढरा’ हत्ती
By admin | Published: June 2, 2017 12:44 AM2017-06-02T00:44:47+5:302017-06-02T00:44:47+5:30
आजरा पाणीपुरवठा योजना ‘पांढरा’ हत्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
आजरा : ३७ वर्षांपूर्वी आजऱ्याचे तत्कालीन सरपंच काशिनाथअण्णा चराटी यांच्या प्रयत्नातून हिरण्यकेशी नदीच्या पाण्यावर आधारित आजरा शहराकरिता नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. पुन्हा २००२ मध्ये नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. प्रत्यक्षात २००८ मध्ये योजना कार्यान्वित झाली. सद्य:स्थितीला वारंवार होणाऱ्या गळतीमुळे ग्रामपंचायतीचे लाखो रुपये गळतीच्या दुरुस्तीवर व वीजबिलापोटी खर्च होत असून हा ‘पांढरा’ हत्ती पोसताना ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोलमडत असून नवीन पाणीपुरवठा योजनेची गरज प्रकर्षाने जाणवत आहे.
३५ वर्षांपूर्वी आजरा शहर एका विशिष्ट मर्यादित भागात वसलेले होते. त्यावेळी चराटी यांनी हिरण्यकेशी नदीवर व्हिक्टोरिया पुलाच्या खालील बाजूस बंधारा बांधून शहराकरिता नळ पाणीपुरवठा योजना सुरू केली. कालांतराने शहराचा विस्तार व लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली. सुरुवातीला सातशे कनेक्शन असणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनेचे आज सुमारे सव्वा दोन हजार कनेक्शनधारक आहेत.
मूळ शहरामध्ये विहिरींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने २००० सालापर्यंत पहिली योजना व्यवस्थित सुरू होती. त्यानंतर मात्र उपनगरांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने नवीन योजनेची गरज भासू लागली. स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नातून २००३ मध्ये सव्वादोन कोटी रुपयांच्या नवीन नळ पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाली. या योजनेत अनेक त्रुटी राहिल्या. २००९ मध्ये आजरा शहराची लक्ष्मी यात्रा असल्याने घाईगडबडीने योजनेचे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण न होताच योजनेतून शहराला पाणीपुरवठा सुरू झाला. चित्री नदीवर ज्या ठिकाणी योजनेचे जॅकवेल आहे मुळातच तो भाग उताराचा असल्याने चित्री प्रकल्पातून उन्हाळ्यात पाणी सोडल्यानंतर नदी प्रवाहातून वाहत असतानाच जॅकवेलमध्ये पाणी व इतर वेळी पात्र कोरडे अशी परिस्थिती बनते.
जुन्याच टाक्या, जुनीच पाईपलाईन आजही असल्याने टाक्या व पाईपलाईनला होणाऱ्या गळतीतून लाखो लिटर पाणी वाया जाताना दिसते. चुकीच्या पद्धतीने पाईपलाईन टाकल्याने काही भागात प्रचंड दाबाने पाणी, तर काही वस्त्यांना अगदी दोन-चार घागरी पाणी मिळेल एवढ्याच दाबाने पाणी अशी विसंगती शहरात ठिकठिकाणी दिसते. ठिकठिकाणी मोठ्या गळत्या असल्याने पाणी योजनेच्या मोटर्स दिवस-रात्र चालू ठेवाव्या लागत आहेत. परिणामी भरमसाट येणारी वीज बिले, मोटर दुरुस्ती व गळत्या काढण्याकरिता येणारा खर्च ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नाशी तुलना करता आवाक्याबाहेरचा आहे.
आता चित्री प्रकल्पामधून सायफन पद्धतीने शहराला नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्याची गरज आहे. पुढील २५ वर्षांत शहरात होणाऱ्या संभाव्य नवीन वसाहती, औद्योगिकरणात होणारी वाढ याचाही याकरिता गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे. सायफन पद्धतीने पाणीपुरवठा झाल्यास विद्युत खर्चातही निश्चित बचत होणार आहे.