‘आजरा घनसाळ’ला गुणवत्तेची राष्ट्रीय मोहर

By Admin | Published: April 3, 2016 03:50 AM2016-04-03T03:50:03+5:302016-04-03T03:50:03+5:30

जी. आय. मानांकन : भातासाठी राज्यात प्रथमच, तर देशात आठवे मानांकन; विक्रीसाठी शेतकऱ्यांना घ्यावा लागणार परवाना

'Aajra Ghansal' is the national stamp of quality | ‘आजरा घनसाळ’ला गुणवत्तेची राष्ट्रीय मोहर

‘आजरा घनसाळ’ला गुणवत्तेची राष्ट्रीय मोहर

googlenewsNext

प्रकाश मुंज, कोल्हापूर
भारत सरकारच्या भौगोलिक उपदर्शन रजिस्ट्रीच्यावतीने ३१ मार्च २०१६ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील ‘घनसाळ’ या भाताला मानांकित केले आहे. भातासाठी मिळालेले हे मानांकन महाराष्ट्रासाठी पहिलेच, तर देशात आठवे असून, यामुळे आता आजरा घनसाळ भात गुणवत्तेच्या जोरावर देशासोबत जागतिक पातळीवरही पोहोचणार आहे. यानिमित्त या सुवासिक भाताविषयी घेतलेला आढावा.
‘घन’ म्हणजे सुवास किंवा गंध आणि ‘साळ’ म्हणजे भात. घनसाळ भात लहान मुले, गरोदर स्त्रिया तसेच सतत आजारी असणाऱ्या लोकांना कॅल्शियमयुक्त असा सुगंधी, पौष्टिक, दर्जेदार व सात्त्विक आहे. या भातामध्ये स्निग्ध पदार्थांचे तसेच खनिज पदार्थ, कॅरोटीन यांचे प्रमाण अतिशय कमी असते; परंतु तांदळाच्या टरफलामध्ये ‘बी’ जीवनसत्त्वाचे प्रमाण भरपूर असते. भात पॉलिश करून टरफलामधून उरणारा कोंडा कोंबड्यांचे खाद्य म्हणून उपयोगात आणला जातो. घनसाळ भाताचे पीक उंच असल्यामुळे मळणीनंतर जनावरांसाठी उपयोगी पिंजार जास्त प्रमाणात मिळते. या दुहेरी उपयोगामुळे शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होतो. याचबरोबर भाताच्या तुसाचा उपयोग वीट भाजण्यासाठी करतात. तूस जाळल्यानंतर मिळणाऱ्या काळपट राखेचा उपयोग जमिनीचा सामू सुधारण्यासाठी होतो.
घनसाळ भाताचे उत्पादन जरी कमी असले तरी घनसाळला मिळणाऱ्या वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना उत्पादन कमी पण भाव अधिक मिळतो. घनसाळ भाताचे रोप उंच असले तरी मिळणारे तांदूळ लहान आकाराचे व सुगंधी असतात. त्यामुळे किडींच्या प्रादुर्भावापासून वाचण्यास जास्त उपयोग होतो.
शेतकऱ्यांच्या अपेक्षा
घनसाळ भाताच्या उत्पादनासंदर्भात कृषी विद्यापीठ, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद व विविध स्तरांतून मार्गदर्शन, प्रोत्साहन व विपणनासंदर्भात आधुनिक तंत्राच्या सहायाने शेती करण्याविषयी मार्गदर्शन व बाजारपेठेविषयी माहिती मिळावी. घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने विशेष अनुदान दिले पाहिजे. तसेच बँकांकडून पुरेसा कर्जपुरवठा मिळेल हे पाहिले पाहिजे.
उत्पादन व विक्रीसाठी ‘तांदूळ महोत्सवाचे’ शासन पातळीवर आयोजन करणे गरजेचे आहे. १ ते ५ किलोमध्ये पॅकिंग उपलब्ध करणे जेणे करून लोकांना खरेदी करणे सोपे जाते. याचबरोबर आजरा घनसाळपासून बिस्किटस्, केक, इडली, उत्ताप्पा व इतर खाद्यपदार्थ बनविण्याची गरज आहे.
अन्य मानांकित वस्तू
नागपुरची संत्री, कोल्हापूरचा गूळ, वरळीचे पेंटिंग, नाशिकची द्राक्षे व वैली वाईन, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, पुणेरी पगडी, सोलापूरची चादर व टेरी टॉवेल, लासलगावचा कांदा, मंगळवेड्याची ज्वारी, वेंर्गुेलेचा काजू, नवापूरची तूरडाळ, सिंधुदुर्ग व रत्नागिरीचा कोकमसह राज्यातील पैटनी साडी व फेब्रिक्स.
देशातील मानांकित वाण
१. केरळचे नवरा भात
२. केरळचे पोक्कली भात
३. केरळचे वायनाद जिराकसला भात
४. केरळचे गंधकसला भात
५. उत्तर प्रदेशचा कलन्माक भात
६. केरळचे कै पाड भात
७. उत्तर भारतातील बासमती
८. महाराष्ट्राचा आजरा घनसाळ भात
आजरा घनसाळ भाताला जी. आय. चे मानांकन मिळाल्यामुळे याचे उत्पादन घेण्यापूर्वी आता चेन्नईतील जी. आय. कार्यालयातून शेतकऱ्यांना परवाना घ्यावा लागणार आहे. जे घेणार नाहीत त्यांना भात विकता येणार नाही. तसेच भेसळीवर नियंत्रण राहणार आहे. भेसळ होत असलेल्या ठिकाणी छापे टाकून असे प्रकार उघडकीस आणण्याची जबाबदारी मंडळावर आहे.
- संभाजी सावंत, अध्यक्ष
आजरा तालुका शेतकरी विकास मंडळ
उत्पादन प्रक्रिया, पॅकिंग व पोषक मूल्य यांचे ब्रँडिग करून विदेशातील ‘अन्न व औषध’च्या कसोटींना आजरा घनसाळला उतरावे लागणार आहे. आजरा शेतकरी मंडळाने या भाताचे स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले पाहिजे.
- प्राचार्य डॉ. एन. व्ही शहा,
‘घनसाळ’चे तज्ज्ञ, गगनबावडा
घनसाळची कार्यक्षम मार्केटिंग व्यवस्था निर्माण करून हा तांदूळ ग्राहकांना उपलब्ध करून दिला पाहिजे. शहरांत व मॉल्स्मध्ये याचे प्रदर्शन व विक्री नियमित करावी म्हणजे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. - डॉ. रामदास बोलके,
संशोधक विद्यार्थी, विद्यापीठ.
मानांकनामुळे पारंपरिक शेतकऱ्यांत व्यावसायिक दृष्टी निर्माण होऊन उसापेक्षा अधिक दर पदरात पाडून घेण्यात तो अगे्रसर राहील. परवान्यासाठी चेन्नईतील जी. आय. कार्यालयात अर्ज करावे लागतील. याची फी कमी नसल्यास परवान्याला विरोध करू.
- संभाजी इंदल, शेतकरी, आजरा.

Web Title: 'Aajra Ghansal' is the national stamp of quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.