आक्रोश पदयात्रा: म्या काय राजू शेट्टींच्या न्हाई.. चळवळीच्या पायाला हात लावतुया!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 12:04 PM2023-10-27T12:04:43+5:302023-10-27T12:06:47+5:30
काल (बुधवारी) मला व माझ्या सहकारी पत्रकार मित्राला राजू शेट्टी यांची आक्रोश यात्रा कव्हर करण्यासाठी सातवे (ता. पन्हाळा) पाठवण्यात आले होते. ...
काल (बुधवारी) मला व माझ्या सहकारी पत्रकार मित्राला राजू शेट्टी यांची आक्रोश यात्रा कव्हर करण्यासाठी सातवे (ता. पन्हाळा) पाठवण्यात आले होते. या आधी राजू शेट्टी यांची बरीच आंदोलने व ऊस परिषदा मी माझ्या फोटोग्राफीतून कव्हर केल्या आहेत. त्यामुळे वेगळे काही फोटो मिळतील अथवा या स्टोरीचे विशेष प्रेशर मी घेतले नव्हते. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या क्षेत्रातून ही ५२२ कि.मी. ची आक्रोश पदयात्रा सुरू आहे. ज्या गावात ही यात्रा जात आहे त्या गावातील लोकांना काय वाटतंय, हा आमच्या स्टोरीचा मूळ गाभा ठरवून आम्ही त्या गावात पोहचलो.
एखाद्या सणाप्रमाणे उत्साही वातावरण गावात होते. राजू शेट्टी यांचे स्वागत जेसीबीने फुलांच्या पाकळ्या उधळून सुरू होते. मला छापण्यासाठी खूप छान फोटोही मिळाले. पारावर बसलेल्या गावच्या पोरांच्या घोळक्यात आम्ही शिरलो. गट-तट विसरून लोकांनी उत्स्फूर्तपणे कसा सहभाग दिला आहे, याबद्दल ते बोलत होते. गावच्या मुख्य चौकात पदयात्रेत चालत आलेल्या ६०० शेतकऱ्यांसाठी सर्व गावकऱ्यांनी जेवण ठेवले होते. भल्या मोठ्या मांडवात दमलेले शेतकरी समाधानाने जेवत होते. प्रत्येक घरटी भाकऱ्या व जमेल तसं जेवणाचं साहित्य गावकऱ्यांनी जमवून हे जेवण घातलं होतं. न सांगता उत्साहीपणे तरुण मंडळी सर्वांना जेवण वाढतेलं चित्र मला खूपच भावलं .
'दुपारची वेळ हाय तुम्ही लई लांबून आलायसा, आमच्या गावचं जेवण जेवा चला ' असे म्हणत ओढतच कार्यकर्ता आम्हाला जेवायला घेऊन गेला. एका बोटाने तुटतील अशा व प्रत्येक माउलीच्या हाताची चव मिश्रित झालेल्या मऊ भाकऱ्या, ताजाताजा खरडा, आख्खा मसूर, भात व खाईल तेवढं गोडसर साईचं दही तेही बादलीतून वाढत होते. मित्रांनो इतकं सुंदर चवीचं जेवण एखाद्या हॉटेल मध्येही मिळणार नाही. आणि मिळाले तर हजारो रुपये लोक देतील. थोडं पोटासाठी बाकी सर्व जिभेसाठी मी भरपूर जेवलो. तेल, तांदूळ, साखर जे शिल्लक राहिलेली पोती गावचे महिला व पुरुष यात्रेबरोबर आलेल्या ट्रॉलीत ठेवत होते व तो ट्रॉलीवाला जागा नाही, ठेवू नका म्हणत भांडत होता. त्यावर एक आज्जी म्हणाली, ' ठेव रं पुढच्या गावात तुम्हासनी जेवाण कमी पडाय नगं म्हणून देतुया. '
काय ही गावकरी लोक आहेत व का करत आहेत ? त्याचे उत्तर मला मिळतं नव्हते. हा विचार करतच राजू शेट्टी जिथे आराम करत होते तेथे त्यांना भेटायला आम्ही गेलो. कारखाना मालक, त्यांचे विचार, यात्रेला मिळालेला लोकांचा प्रतिसाद, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आलेला फोन यावर ते भरभरून बोलत होते. इतक्यात एक म्हातारा शेतकरी हातात कसली बाटली घेऊन तेथे आला " साहेब लांबून आलोय तुमच्यासाठी, आणि झटकन राजू शेट्टी यांच्या पायाजवळ बसून त्या बाटलीतले औषध लावू लागला. मामा पायाला का हात लावताय, तुम्ही मोठं हाय ! असं म्हणत झोपलेले राजू शेट्टी लगबगीनं उठले.
त्यावर म्हातारा म्हणाला, '' आमच्यासाठी चालून चालून पायाला फोड आल्याती त्यासाठी हळद आणि रक्तचंदन उगळून आणलया. आणि म्या काय राजू शेट्टीच्या पायाला हात लावत नाही, चळवळीच्या पायाला हात लावतुया. " आणि मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते.
- आदित्य वेल्हाळ, छायाचित्रकार, कोल्हापूर.