आप्पांची फटकेबाजी, मुश्रीफांची टोलेबाजी
By Admin | Published: May 21, 2015 12:37 AM2015-05-21T00:37:53+5:302015-05-21T00:44:50+5:30
विधानपरिषद जवळ आली वाटतं...
कोल्हापूर : जुन्या मंडळींवर अजून कारवाईची टांगती तलवार असल्याने नवीन चेहऱ्यांना संधी देऊन समाजात चांगला संदेश देऊया, असे माझे वैयक्तिक मत असल्याचे सांगत, अध्यक्षपदासाठी हसन मुश्रीफ व पी. एन. पाटील यांनी द्रोण लावला आहे. ते ठरवत असतील तर आपले काय? असे म्हणत आमदार महादेवराव महाडिक यांनी शासकीय विश्रामगृहाच्या दारात येताच फटकेबाजी सुरू केली; तर ‘गोकुळ’ दूध संघाचा चेअरमन करताना तो काळा आहे की गोरा हे आम्ही विचारले होते का? आता तुम्ही बॅँकेत का रस दाखवता? असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी महादेवराव महाडिक यांना लगावला.
जिल्हा बॅँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीबाबत बुधवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृह येथे कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. अध्यक्षपदावर दोन्ही कॉँग्रेसनी दावा केल्याने नेमकी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता ताणली आहे. त्यामुळे शासकीय विश्रामगृह येथे होणाऱ्या बैठकीला कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. नेहमीप्रमाणे आमदार महादेवराव महाडिक यांची वेळेत एंट्री झाली. त्यांच्या स्वागतासाठी भैया माने, नाविद मुश्रीफ, राजेंद्र पाटील-यड्रावकर पुढे आले. ‘राजू, काय सुरू आहे? घोडे दामटले की नाही?’ यावर ‘घोडे दामटायला तुमची ताकद पाहिजे,’ असे यड्रावकर यांनी सांगितले. ‘मुश्रीफ व पी. एन. यांनी आपले द्रोण लावले आहेत. ते ठरवत असतील तर आपले काय? माझी भूमिका उघड असते. जुन्या संचालकांवर कारवाईची टांगती तलवार असल्याने नव्यांना संधी द्यावी. जुन्यांची प्रतिमा सुधारण्याची संधी आहे. कार्यकर्त्यांत चांगला संदेश जाईल; पण दानत असली पाहिजे,’ असा टोला आमदार महाडिक यांनी हाणला. तोपर्यंत महाडिक यांना प्रकाश आवाडे यांचा फोन आला. तो उचलत ‘अण्णा, सर्किट हाऊसवर या, तुम्हीपण मैदानात या’ असे त्यांनी सांगितले. त्यानंतर महाडिक विश्रामगृहातील केबिनमध्ये गेले. त्यावेळी हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांच्याशी आमदार महाडिक यांची चर्चा सुरू झाली. यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले, ‘गोकुळ’चा चेअरमन करताना तो काळा की गोरा हे आम्ही विचारले का? ‘महानंदा’सह इतर संस्थांमध्ये कोणाची वर्णी लावली याबाबत विचारले का? ‘गोकुळ’ तुम्हाला दिल्याने जिल्हा बॅँकेत का अपेक्षा दाखवता? असा टोला आमदार मुश्रीफ यांनी लगावला.
विधानपरिषद जवळ आली वाटतं...
बैठकीच्या ठिकाणी चंगेजखान पठाण यांना पाहून ‘तू कसा काय आलास?’ अशी विचारणा महाडिक यानंी केली. ‘तुम्ही एवढी चौकशी का करता, विधानपरिषद जवळ आली म्हणून विचारपूस सुरू केली का?’ असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.
‘घड्याळा’ला माझेच मनगट पाहिजे
बैठक संपवून आमदार महाडिक व के. पी. पाटील बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी ‘काय झाले?’ अशी विचारणा केली. यावर ‘हाताशिवाय घड्याळाला शोभा नाही, नाहीतर ते फुटते. त्यासाठी माझेच मनगट पाहिजे.’ असा टोला महाडिक यांनी हाणला.
लहान भाऊ म्हणायचे आणि दणका द्यायचा !
बैठक संपवून सर्व नेते बाहेर आल्यानंतर फोटोसाठी पोझ दिली, यावेळी पी. एन. पाटील यांच्याशेजारीच उभा राहत ‘लहान भाऊ मोठ्या भावाच्या जवळ उभारल्या’चे के. पी. पाटील यांनी सांगितले. यावर ‘लहान म्हणायचे आणि दणका द्यायचा,’ अशी कोपरखळी ‘पी. एन.’ यांनी हाणली.
जुन्या चेहऱ्यांना नको, नवीन चेहऱ्यांना संधी द्या
- महाडिक
‘गोकुळ’चा चेअरमन काळा की गोरा हे विचारले का?
- मुश्रीफ