‘आप’कडून शासनास प्रतीकात्मक फास
By admin | Published: June 9, 2015 01:03 AM2015-06-09T01:03:36+5:302015-06-09T01:19:10+5:30
थाळी व घंटानाद आंदोलन : सरसकट एकरी २५ हजार पीककर्ज देण्याची मागणी
कोल्हापूर : एकरी २५ हजार रुपये पीककर्ज सरसकट सर्व शेतकऱ्यांना द्यावे, या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ सोमवारी आम आदमी पार्टीतर्फे थाळी व घंटानाद करण्यात आला. शासनाचा निषेध करणारा प्रतीकात्मक फास न स्वीकारल्यामुळे शासनासह निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचाही निषेध करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फाटकाला तो अडकविण्यात आला.
दुपारी बाराच्या सुमारास आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. या ठिकाणी शासनाच्या धोरणाविरोधात घोषणा देण्यात आल्या. एकरी २५ हजार रुपये पीक कर्ज सरसकट सर्वच शेतकऱ्यांना मिळावे; उसाला, कापसाला व सोयाबीनला स्वामिनाथन समिती अहवालानुसार उत्पादन खर्च आणि ५० टक्के नफा एवढा हमीभाव द्यावा, अशी मागणी केंद्र व राज्य शासनाकडे करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी घंटा व थाळीनाद केला. शासनाचे प्रतिनिधी या नात्याने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी प्रतीकात्मक फास स्वीकारावा, अशी मागणी केली. ती अमान्य केल्याने आंदोलकांनी शासनाबरोबरच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचाही निषेध नोंदवीत सोबत आणलेले चार फास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फाटकाला अडकविले. यानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
‘आप’ने १७ ते २४ मे २०१५ या काळात मराठवाडा व विदर्भातील १०० गावांत जाऊन शेतकरी व शेतमजुरांशी संवाद साधला. यावेळी ६४ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटी दिल्या असून, त्याबाबतची गांभीर्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. तरीही देवेंद्र फडणवीस सरकार हातावर हात धरून बसले आहे. सरकारने सर्व शेतकऱ्यांना एकरी २५००० रुपये नव्याने कर्ज द्यावे. उसाला ‘एफआरपी’प्रमाणे भाव देण्यात यावा. दुधाला योग्य भाव मिळेल अशी व्यवस्था करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
आंदोलनात जिल्हा संयोजक नारायण पोवार, नाथाजीराव पोवार, संदीप देसाई, मृणालिनी इंगवले, भिकाजी कांबळे, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)