आप्पा-दादांची सत्तेची ‘खेळी’ थोडक्यात हुकली
By admin | Published: November 3, 2015 12:44 AM2015-11-03T00:44:47+5:302015-11-03T00:45:28+5:30
महापालिका निकाल : काँग्रेस-राष्ट्रवादीला यश; शिवसेनेचा धुव्वा
विश्वास पाटील --कोल्हापूर--खासदारकी, आमदारकी ते जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकत ‘राजाराम’ आणि ‘गोकुळ’वर सत्ता काबीज करीत जिल्ह्याच्या राजकारणात एक हाती नेतृत्वाची मोहर उमटविणाऱ्या आमदार महादेवराव महाडिक ऊर्फ आप्पा आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील ऊर्फ दादा यांची महापालिका काबीज करण्याची ‘खेळी’ केवळ आठ जागांनी हुकली.
कोल्हापूर महापालिकेवर अनेक वर्षे सत्ता गाजविणारे महादेवराव महाडिक यांची ताराराणी आघाडी आणि केव्हाही दोन आकडी संख्या न गाठलेले भाजप यांनी एकत्र येऊन कोल्हापूरच्या राजकारणाला नवे वळण देण्याचा प्रयत्न केला. ही खेळी करताना ८१ जागांपैकी ताराराणी आघाडीने ४० जागा लढविल्या, तर भाजपने ३७ जागा लढविल्या. उर्वरित चार जागा मित्रपक्षांना सोडल्या होत्या. यापैकी ताराराणीने १९, तर भाजपने १४ जागा जिंकल्या. निवडणूकपूर्व आघाडी केलेल्या या पक्षांना केवळ आठ जागा बहुमतासाठी कमी पडल्या. या उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्वच्या सर्व जागा लढवित केवळ अनुक्रमे २७ व १५ जागा जिंकल्या. या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र येण्याचे संकेत दिल्यानेच त्यांचा विजय म्हणावा लागेल; अन्यथा आप्पा-दादांच्या आघाडीने कडवी झुंज देत शिखर गाठले होते. ती संधी थोडक्यात हुकली.
ही निवडणूक अनेक अर्थाने लक्षवेधी ठरली होती. भाजप-शिवसेनेच्या राज्यस्तरीय संबंधावर परिणाम करणारी निवडणूक म्हणूनही तिच्याकडे पाहिले गेले. कारण याच निवडणुकीच्या प्रचारात या दोन सत्तेतल्या पक्षांनी एकमेकांना शड्डू ठोकले. विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या या निवडणुकीत मुख्यत: भाजपचे भवितव्य पणाला लागले होते; परंतु मतदारांनी भाजपच्या पारड्यात संमिश्र यश टाकले. शिवसेनेचा दारूण पराभव झाला. या पक्षाला कशाबशा चारच जागा मिळाल्या. ‘शिवसेनेपेक्षा जास्त जिंकायचे’ भाजपचे स्वप्न साकार झाले तरी त्यांना महापालिकेवर मात्र सत्तेचे कमळ फुलविता आले नाही. विधानसभा निवडणुकीत जे लोकमानस होते तेच वर्षभरानंतर कायम आहे का याचीही लिटमस टेस्ट म्हणून या निकालाकडे पाहिले गेले; परंतु त्यामध्ये भाजपचा जनाधार कमी झाल्याचे दिसले. या निवडणुकीत भाजपने काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी हातमिळवणी केल्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला. भाजपने काही मटकेवाले, गुंडांना उमेदवारी दिल्याच्या आरोपामुळे जनतेच्या रोषास सामोरे जावे लागले.
याउलट काँग्रेसचा जो मूळ जनाधार आहे, तोच त्यांच्या पाठीशी राहिल्याने माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी एकाकी झुंज देऊनही काँग्रेसला इतके चांगले यश मिळाले. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपाही त्यांनी या निकालाने काढला. लोकसभेला खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज यांची मदत घेऊन विजय मिळविला व विधानसभेला मात्र लगेच त्यांच्या विरोधात अमल महाडिक उतरले. काँग्रेसच्या
-/पान ६ वर
विधानसभेची भरपाई
विधानसभा निवडणुकीत दहापैकी सहा जागा शिवसेनेला आणि प्रत्येकी दोन भाजप व राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या. काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता. त्यामुळे महापालिकेत काँग्रेसची स्थिती काय राहणार याबद्दल उत्सुकता होती; परंतु या निवडणुकीने काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकल्याचे चित्र शहरात दिसले.