‘आपला दवाखाना’, कोल्हापुरात कसाबसा एक सुरू; बाकीचे १२ दवाखाने अद्याप कागदावरच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 04:13 PM2024-06-11T16:13:18+5:302024-06-11T16:14:01+5:30
दीड वर्षापूर्वी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही सर्वसामान्यांसाठीची योजना सरकारने घोषित केली.
कोल्हापूर : ‘शासकीय काम आणि बारा महिने थांब’ अशा शब्दात शासकीय कामाचे उपहासात्मक वर्णन केले जाते. शासकीय योजनांच्या बाबतीतही असाच अनुभव येतो. दीड वर्षापूर्वी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही सर्वसामान्यांसाठीची योजना सरकारने घोषित केली. या योजनेंतर्गत महापालिका क्षेत्रात १३ दवाखाने सुरू करायचे होते, त्यातील कसाबसा एक दवाखाना सुरू करण्यात आला. बाकीचे १२ दवाखाने अद्याप कागदावरच राहिले आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीमुळे दवाखाने सुरू करण्यास विलंब झाला आहे. लवकरच पाच दवाखाने सुरू करत आहोत. जिल्हा परिषदेकडून औषध खरेदी करण्यात येणार आहे. औषधे खरेदी होऊन आमच्याकडे आली की हे दवाखाने सुरू केले जातील. या दवाखान्याकरिता लागणारे वैद्यकीय अधिकारी, नर्स यांच्यासह आवश्यक कर्मचारी यांची नियुक्तीही करण्यात आली आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक सुप्रिया देशमुख यांनी सांगितले.
१३ दवाखान्यांस मंजुरी, प्रत्यक्षात एकच सुरु
कोल्हापूर शहरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने १३ आपला दवाखाना सुरू करण्यास मंजुरी मिळाली होती. योजनेची घोषणा होताच सुरूवातीला पितळी गणपती मंदिराजवळील महापालिकेच्या जागेत एक दवाखाना सुरू करण्यात आला. तेथे एक वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स तसेच अन्य कर्मचारी नेमण्यात आले आहेत. या दवाखान्याची वेळ दुपारी २ ते रात्री १० अशी आहे.
‘लोकमत’ने केली पाहणी
पितळी गणपती चौक : दुपारी तीन वाजता
याठिकाणी रोज २० ते २५ रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. कधी कधी अधिकाऱ्यांच्या बैठका असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांना तिकडे जावे लागते. त्यांना अन्य जबाबदाऱ्याही दिल्या जातात. लॅब असिस्टंट दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत उपलब्ध असतात. दवाखाना ताराबाई पार्कमध्ये असला तरी बायोमेट्रिक हजेरी देण्यासाठी रोज दोनवेळा महापालिकेत जावे लागते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काही मिनिटे उशीर होतो. दवाखाना बंद करतेवेळी काही मिनिटे अगोदर जावे लागते.
आपला दवाखाना येथे चांगली औषधे दिली जातात. वेगवेगळ्या चाचण्याही केल्या जातात. त्यामुळे रुग्णांचा चांगला प्रतिसाद आहे. मृत्यू दाखला देण्याची जबाबदारी असते, त्यामुळे कधी कधी बाहेर जावे लागते. बैठकांनाही जावे लागते. परंतु, रुग्ण सायंकाळी पाचनंतर येत असल्याने तशी गैरसोय होत नाही. - डॉ. सुनीता पाटील वैद्यकीय अधिकारी