आपले सरकार पोर्टल सहा दिवसांपासून बंद, एमपीएससीचे अर्जच भरता येईना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 15:25 IST2025-04-16T15:25:16+5:302025-04-16T15:25:50+5:30
लाखो विद्यार्थी घायगुतीला; प्रशासनाचे दुर्लक्ष

आपले सरकार पोर्टल सहा दिवसांपासून बंद, एमपीएससीचे अर्जच भरता येईना
शिवाजी सावंत
गारगोटी (जि. कोल्हापूर) : एकीकडे स्पर्धा परीक्षेला बळ देण्याचा गवगवा सरकारकडून केला जात असला तरी दुसरीकडे याच परीक्षांमध्ये अडथळे ठरणाऱ्या तांत्रिक बाबींकडे मात्र सरकार सोईस्कर दुर्लक्ष करत असल्याचा प्रत्यय सध्या राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षार्थी घेत आहे. महाराष्ट्र शासनाचे ‘आपले सरकार’ हे ऑनलाइन पोर्टल मागील सहा दिवसांपासून बंद असून, अर्ज दाखल करण्याच्या वेबसाइटचे सर्व्हर डाऊन असल्याने राज्यातील लाखो एमपीएससी परीक्षार्थी अडचणीत आले आहेत.
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ एप्रिल असून, एकाच दिवशी लाखो अर्ज ऑनलाइन दाखल होतील का, अर्ज दाखल न झाल्यास होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.
आपले सरकार ऑनलाइन महा ई सेवा केंद्रातून जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिलेयर तसेच शिक्षणाशी संबंधित अन्य महत्त्वाचे दस्तऐवज, अर्ज करण्यासाठी हे पोर्टल वापरले जाते. मात्र, पोर्टलवर तांत्रिक बिघाड आल्याने अर्ज प्रक्रिया ९ एप्रिलच्या रात्री १२ वाजेपासून ठप्प आहे. एमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची उद्या गुरुवारपर्यंत अंतिम मुदत आहे. पोर्टल बंद राहत असल्याने अर्ज करणे कठीण होऊन बसले आहे.
तांत्रिक अडचणींमुळे त्रास
पोर्टलवर लॉगइन होत नाही किंवा लॉगइन झाल्यावर अर्ज भरताना सर्व्हर एरर दाखवते. भरलेला अर्ज सेव्ह होत नाही किंवा सबमिट करताना पोर्टल क्रॅश होते. यामुळे वेळ, पैसे आणि मेहनत वाया जात आहे.
ग्रामीण भागात अधिक फटका
ग्रामीण भागातील इंटरनेटचा वेग आधीच मंद आहे. त्यात पोर्टल काम करत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी आणि अनेक शिक्षण संस्थांनी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, शासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती किंवा मुदतवाढ जाहीर केलेली नाही.
आपले सरकार हे महाराष्ट्र सरकारचे सरकार असल्याप्रमाणे वागत असून, ते पूर्णपणे निरंकुश आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला त्यांना जबाबदार धरून कडक कारवाई करावी. विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करण्यासाठी मुदत वाढवून न दिल्यास विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून याचा सरकारला जाब विचारावा लागेल. - अविनाश शिंदे, तालुकाप्रमुख, शिंदेसेना, भुदरगड