‘डोक्यावरील आरती’चा आजरा तालुक्यात थरार, प्रथा अजूनही जिवंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 01:55 PM2018-10-19T13:55:06+5:302018-10-19T16:00:37+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या तालुक्याच्या गावात ‘डोक्यावरील आरती’ची प्रथा आहे. नवरात्रामध्ये जागरादिवशी ही ‘डोक्यावरील आरती’ केली जाते.
समीर देशपांडे
कोल्हापूर (आजरा) : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या तालुक्याच्या गावात ‘डोक्यावरील आरती’ची प्रथा आहे. नवरात्रामध्ये जागरादिवशी ही ‘आरती’ केली जाते. बुधवारी संध्याकाळी साडे सात वाजता आजरा येथे हा ‘डोक्यावरील आरती’चा थरार भाविकांना पहायला मिळाला. गेली अनेक वर्षे सुरु असलेली ही प्रथा आजरा शहरामध्ये अजूनही जिवंत आहे.
डोक्यावरून आरतीचे ताट पडल्यास संबंधित गुरवाला शिक्षा केल्याची उदाहरणे भूतकाळामध्ये आहेत. मात्र गेली अनेक वर्षे ही आरती सहजपणे पार पडत आली आहे. बुधवारी संध्याकाळी साडे सात वाजता आजरा येथे हा ‘डोक्यावरील आरती’चा थरार भाविकांना पहायला मिळाला. ही आरती उत्साही वातावरणात संपन्न झाली.
‘डोक्यावरील आरती’ करण्यापूर्वी देवस्थानचे गुरव यांच्या डोक्याचे पूर्ण मुंडण केले जाते. तुळतुळीत डोक्यावर पितळी ताट ठेवले जाते. त्यामध्ये कणिक मळून दिवा केला जातो आणि हा पेटता दिवा या पितळी ताटात ठेवला जातो. भावेश्वरी आणि श्री रवळनाथाला गाऱ्हाणे घातले जाते. दिवा असलेले पितळी ताट गुरव उचलतात. तुळतुळीत डोक्यावर ठेवतात आणि यानंतरची १५ मिनिटे एक वेगळेच वातावरण तयार होते.
मारूती गुरव हे डोक्यावरील आरती नेत होते. त्यांच्या पाठीमागे शस्त्रे घेतलेले पाच मानकरी असतात. आजूबाजुला देवस्थान समितीचे पदाधिकारी, पंचमंडळी असतात. गर्दीमध्ये ‘चांगभलं’च्या गजरामध्ये ही ‘डोक्यावरील आरती’पुढे जात असते.
मंदिराच्या पुढच्या बाजुला उपस्थित असलेल्या हजारो भाविकांचे हात जोडलेले असतात आणि तुळतुळीत डोक्यावर आरतीचे ताट घेवून मारूती गुरव हे आत्मविश्वासाने एकेक पाऊल टाकत असतात. तणावपूर्ण असे वातावरण यावेळी जाणवत असते. मात्र गेली अनेक वर्षे सुरु असलेली ही ‘डोक्यावरील आरती’ची प्रथा आजरा शहरामध्ये अजूनही जिवंत आहे.